दौंड : तालुक्यातील वरवंड येथील वनविभागाच्या 5 हेक्टर क्षेत्रावर तीन शेतकर्यांनी केलेल्या अतिक्रमणावर वनविभागाच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी मोठ्या बंदोबस्तात कारवाई केली. या संपूर्ण क्षेत्रावर शेतकर्यांनी लावलेली 2500 ते 3000 हजार डाळिंबीची झाडे तीन जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकीत वनविभागाने अतिक्रमण केलेले क्षेत्र ताब्यात घेतले आणि संबंधित तीन शेतकर्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. वनाविभाच्या या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
वरवंड गावच्या हद्दीत वनविभागाच्या जागेत तीन शेतकर्यांनी तब्बल पाच हेक्टरवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाच्या जागेवर संबंधित शेतकरी शेती करीत होते. येथे त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली होती. या डाळिंबाच्या बागेत तब्बल तीन हजारांच्या आसपास झाडे होती. ही बाग वनविभागाच्या अधिकार्यांनी मोठ्या बंदोबस्तात भुईसपाट केली. या कारवाईत पुणे विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग, महेश भावसार, वैभव भालेराव तसेच चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी कोदे, शुभांगी चव्हाण, महादेव हजारे, आर. एल. सय्यद, अंकुश खरात, तसेच पुणे वनविभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी आणि एसआरपीची टीम सहभागी झाली होती. वनाविभाच्या जागेवरील अतिक्रमण टप्प्या-टप्प्याने कारवाई करून अशाच प्रकारे हटविण्यात येणार असल्याची माहिती दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव हजारे यांनी दिली.