जंगल आणि वन्यजीवांवर देखरेख ठेवणे होणार सोपे
पुणे : वनविभागाला ड्रोन आणि पीटीझेड कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे वनक्षेत्राच्या सुरक्षेबरोबरच वन्यप्राण्यांच्या विविध हालचालींवर देखील विभागाला नजर ठेवता येणार आहे. वनविभागाने संरक्षित केलेल्या प्रदेशात एक समूह नेहमी येथे मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन येत असत. मात्र या समूहाकडून अनेकदा वनसंपत्तीचे नुकसान केले जात. ही बाब वनसंरक्षकांच्या लक्षात आल्यावर वनविभागाने ड्रोनची तरतूद केली. आपल्यावर वॉच’ ठेवला जात आहे, ही बाब लक्षात येताच त्या समुहाकडून होणार्या नुकसानींना आळा बसला आणि अशाप्रकारे त्या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यात वन विभागाला मोठी मदत मिळाली. हीच बाब लक्षात घेत आता कॅमेरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शेकडो एकरांत पसरलेला वनांचा प्रदेश आणि या प्रदेशातील वन्यजीव यांच्यावरील देखरेख ही सोयीची आणि कमी कालावधीत करणे शक्य होणार आहे.
प्राण्यांची सुरक्षा वाढणार
अनेकदा वन्यजीव संरक्षित प्रदेशात नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत नाही. झालेच तरी ते ओझरते अथवा काही क्षणांपुरते मर्यादित असते. अशावेळी ड्रोन आणि कॅमेर्यांच्या सहाय्याने विविध भागांमधील प्राण्यांच्या हालचाली टिपून ते विभागाच्या केंद्रातून पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जातील. यामुळे नागरिकांनाही ते प्राणी पाहण्याचे आनंद लुटता येईल. तसेच याद्वारे प्राण्यांच्या सुरक्षेवरही त्याचा चांगला परिणाम दिसेल, असेही वानखेडे यांनी सांगितले.
पाच ड्रोन आणि पीटीझेड कॅमेरा मंजूर
गेल्या अनेक दिवसांपासून विभागातर्फे वनांच्या सुरक्षेसाठी ड्रोन आणि पीटीझेड कॅमेर्याबाबत मागणी केली जात होती. नुकतीच या मागणीला मंजुरी देण्यात आली असून, विभागासाठी पाच ड्रोन आणि पाच पीटीझेड कॅमेरा मंजूर करण्यात आले आहे. साधारणत: पुढील दीड महिन्यात या वस्तूंची खरेदी करून ती कार्यान्वित केली जातील. केवळ वनांचे संरक्षणच नव्हे, तर इको टुरिझमच्या विकासासाठी देखील या कॅमेर्यांचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती पुणे वनविभागातील मुख्य वन्यजीव वनसंरक्षक आर. के. वानखेडे यांनी दिली.
अभयारण्य आणि कॅमेरांची संख्या
ड्रोन :
सुपे अभयारण्य- 1
रेहकुरी अभयारण्य-1
माळढोक सर्वेक्षण-2
भीमाशंकर अभयारण्य-1
पीटीझेड कॅमेरा :
भीमाशंकर -2
माळढोक सर्वेक्षण- 2