नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ताज्या क्रमवारीत टीम इंडिया तिसर्या स्थानी आली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकदिवसीय क्रमवारीतील अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. याआधी तिसर्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला आता चौथ्या स्थानावर जावे लागले आहे; तर चौथ्या स्थानावरील भारताला तिसरा क्रमांक मिळाला आहे. दुसरीकडे कसोटी आणि ट्वेंटीत भारताने आपला दरारा कायम ठेवला असून कसोटीत पहिल्या तर ट्वेंटीमध्ये दुसर्या स्थानी विराजमान आहे. इंग्लंडमध्ये होणार्या आगामी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याच्या वेस्ट इंडीजच्या आशांना मात्र धक्का बसला आहे. वेस्ट इंडीज नवव्या क्रमांकावर आहे आणि आठव्या क्रमांकावरील पाकिस्तानपेक्षा त्यांचे नऊ गुण कमी आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत क्रमवारीतील पहिले आठ संघच 2019 मधील विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र असतील.
दहा संघांना पात्रता फेरीत खेळावे लागणार: आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या पात्रतेसाठी ’आयसीसी’ने 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. त्यामुळे आता पुढील चार महिन्यांत नियोजित एकदिवसीय सामन्यांमध्ये शक्य तितके जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजला करावे लागतील. अन्यथा इंग्लंडमधील स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी त्यांना पात्रता स्पर्धेत खेळावे लागू शकते. एकदिवसीय क्रमवारीतील पहिले आठ संघ वगळता इतर दहा संघांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. ही फेरी पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. या दहा संघांपैकी पहिले दोन संघ विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 30 सप्टेंबरच्या आधी वेस्ट इंडीज अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या जूनमध्ये होणार्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी मात्र वेस्ट इंडीजचा संघ पात्र ठरू शकलेला नाही.
पुजारा, हरमनप्रीतची शिफारस
नवी दिल्ली: कसोटीपटू चेतेश्वर पुजारा व महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरमनप्रीत कौरची बीसीसीआयच्या वतीने अर्जुन पुस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुजाराची देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्याने यंदाच्या हंगामात 1316 धावांची खेळी केली आहे. ती म्हणजे इतर भारतीय फलंदाजामध्ये सर्वाधिक जास्त आहे. हरमनप्रीत सिंग ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात आणि महिला आशिया कपमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनकडून (एआयएफएफ) ओइनाम बेमबेम देवी, जेजे लालपेखलुआ और गुरप्रीत संधू यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.