वरणगावातील रेशनकार्ड धारकांना पूर्ववत धान्याचे व्हावे वितरण

0

तहसीलदारांसह नगराध्यक्षांमध्ये महत्वपूर्ण बैठक

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथील रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याने त्यांनी नगराध्यक्षांकडे तक्रार केली होती. या संदर्भात नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तसेच भुसावळ तहसील प्रशासनाकडे तक्रार केली होती. रेशनकार्ड धारकांना न्याय न मिळाल्यास 25 जून रोजी भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. या अनुषंगाने प्रशासनाने दखल घेत मंगळवारी तहसीलदार महेंद्र पवार यांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासोबत बैठक घेतली. लाभार्थींना धान्य मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची ग्वाही प्रसंगी देण्यात आली.

अन्न सुरक्षा यादीतील लाभार्थींना मिळणार धान्य
तहसीलदार पवार म्हणाले की, वरणगाव शहरातील वंचित नागरीकांना रेशन कार्डावर धान्य मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. दुकानदार गोरगरीबांना धान्य देत नसल्याने तातडीन याबाबत दखल घेवून कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. अन्न सुरक्षा योजनेची यादी नगरपरीषदेत उपलब्ध करून दिली जाईल व ज्यांचे नाव या यादीत नाही त्या लाभार्थींचे आधारकार्ड घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. वरणगाव शहरातील ज्येष्ठ नागरीकांना ज्येष्ठ नागरीक ओळख पत्राची बसची पास नगरपरीषदेत उपलब्ध करून द्यावी कारण ज्येष्ठांना भुसावळ येणे शक्य नसल्याचे नगराध्यक्ष म्हणाले. याप्रसंगी तहसीलदारांनी या मागणीबाबतही सकारात्मकता दर्शवत दखल घेण्याचे आश्‍वासन दिले. वरणगाव शहरातील रेशन दुकानदारांची नगरपरीषदेत बैठक लवकरच बैठक घेवून प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असेही तहसीलदार म्हणाले.
यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, भाजपा शहर प्रमुख सुनील माळी, नगरसेवक नितीन माळी, समाजसेवक इरफान पिंजारी, माजी उपसरपंच साजीद कुरेशी, शेख सईद शेख भिकारी, ग्रा.पं.चे माजी सदस्य ज्ञानेश्वर घाटोळे, आकाश निमकर उपस्थित होते.