भुसावळ- संरक्षण क्षेत्रातील चार लाख कर्मचार्यांचे प्रतिनिधित्व करणार्या इंटक, कामगार व बी.एम.एस. या तीन महासंघाने एकत्र येऊन मोदी सरकारच्या संरक्षण क्षेत्र व मजदूर विरोधी धोरणाच्या विरोधात संयुक्त संघर्ष समितीची स्थापना करुन तीव्र आंदोलन पुकारले आहे. तिन्ही महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आयुध निर्माणी वरणगांव येथील बी.एम.एस.,इंटक व कामगार युनियन या संघटनांनी गुरूवार, 14 रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
या मागण्यांसाठी धरणे आंदोलन
संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजेपासून दिवसभर केलेल्या धरणे आंदोलनात प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेची मागणी केली. यामध्ये संरक्षण क्षेत्र व पब्लिक सेक्टर अंडरटेकींग मध्ये निर्गुंतवणुक, थेट परदेशी गुंतवणूक तसेच आउटसोर्सिंग करण्यात येऊ नये. सर्व आयुध निर्माणींना पर्याप्त काम देण्यात यावे, सर्वांना एकसमान 54 घंटे ओ.टी देण्यात यावा, रविवार व सुटीच्या दिवशी कामासाठी बंद केलेला ओ.टी सुरू करण्यात यावा. मिलिटरी फार्म आदी रक्षा संस्थान बंद करण्यात येऊ नये. आयुध निर्माणींच्या प्राँडक्ट्स मध्ये कोर-नॉन कोर असे वर्गीकरण करणे बंद करावे, वन टाईम रिलँक्सेशन देऊन अनुकंपा आधारावर मृत व मेडिकल बोर्डेड आउट कर्मचार्यांच्या आश्रितांना तसेच सर्व अॅप्रेंटीस प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर सेवेत सामावुन घ्यावे, नवीन पेंन्शन योजनेंतर्गत येणार्या कर्मचार्यांना मिनीमम पेंन्शनची गॅरंटी देण्यात यावी, संरक्षण क्षेत्रातील सर्व आस्थापनांमध्ये रीक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी. अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप
मागण्या निर्धारीत वेळेमध्ये मान्य करण्यात आल्या नाही तर आयुध निर्माणी वरणगांवमधील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा बी.एम. एस.चे सचिन चौधरी, इंटकचे महेश पाटील, कामगार युनियनचे सुनिल महाजन आदींनी इशारा दिला आहे.