हॉटेल अस्वादजवळ अपघात ; ट्रीपल सील दुचाकीस्वारांवर कारवाईची गरज
भुसावळ- जाडगावजवळ भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच
वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अस्वादजवळ भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने ती बैलगाडीवर आदळून झालेल्या अपघातात फुलगावचा दुचाकीस्वार ठार झाला तर बैलगाडी चालकासह दुचाकीवर बसलेले दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. कुंदन भागवत कंडारे (21, फुलगाव) असे मयत दुचाकी चालकाचे नाव आहे. या घटनेने फुलगावात शोककळा पसरली आहे.
भरधाव दुचाकी आदळली बैलगाडीवर
धोंडू उमाजी गोटमारे (28) हा ऊस तोड मजूर बैलगाडीद्वारे वरणगावकडे जात असताना कुंदन कंडारे हा तरुण दुचाकीवर आपले मित्र प्रवीण आनंदा कोचरे (18. रा.वरणगाव), जॉनी जॉय फ्रान्सलिन (23, रा.वरणगाव) सोबत ट्रीपल सीट वरणगावकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पाठीमागून थेट बैलगाडीवर आदळल्याने कुंदन कंडारेचा जागीच मृत्यू झाला बैलगाडीस्वारासह दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले. दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की महामार्गावर बैले बिथरलयाने बैलगाडी उलटली. जखमीवर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती कळताच उपनिरीक्षक निलेश वाघ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले व नागरीकांच्या मदतीने त्यांनी जखमींना उपचारार्थ हलवले.
ट्रीपलसीट दुचाकीस्वारांवर व्हावी कारवाई
गेल्या 24 तासात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर तीन मोठे अपघात झाले आहेत. जाडगावच्या जवळच्य अपघातात दुचाकीस्वारांचा जीव गेला तर वरणगावजवळ पुन्हा दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर भुसावळच्या अपघातात रुग्णवाहिकेतील तिघे जखमी झाले. विशेष म्हणजे महामार्गावरील अपघातात ठार झालेले दुचाकीस्वार हे ट्रीपल सीट भरधाव प्रवास करीत असल्याने महामार्ग पोलिसांसह शहर वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवून दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासोबत मद्यपी चालकांची ब्रीथ अॅनलायझर मशीनद्वारे तपासणी करण्याची गरज आहे.