वरणगावकरांना 24 तास पाणी

0

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी 33 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी

भुसावळ- तालुक्यातील वरणगाववासीयांना लवकरच 24 तास पाणीपुरवठा मिळणर असून शहरासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 33 कोटी तीन लाख 80 हजार खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी तांत्रिक मान्यता दिल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रस्ताव तयार करून विविध विभागाच्या मान्यता घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी सादर केला होता. दरम्यान, योजना अंतिम मंजुरीचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे पोहोचला असून लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.

नवीन जलकुंभासह पाईप लाईनचे नवीन काम
योजनेची विशेष बाब म्हणजे या योजनेत सर्व प्रकारचे पाण्याच्या टाक्या नवीन बनवण्यात येतील शिवाय शहरात संपूर्ण पाईप लाईन नवीन टाकण्यात येणार आहे. त्या भागात रस्ते सुद्धा बनवण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आली असून शहरवासीयांना दरडोई 135 लीटर पाणी या योजनेंतर्गत मिळणार आहे. वरणगाव शहरातील नागरीकांना सात दिवस 24 तास पाणी मिळणार आहे. या योजनेमुळे आता संपूर्ण शहरात 70 कोटी रुपयांची भूमिगत गटारीचा प्रस्ताव मंजूर होणार आहे. योजनेंतर्गत सिद्धेश्‍वर नगरात पाच एमएलडीचा फिल्टर प्लँट बांधण्यात येणार आहे. नारीमळा येथे जुन्या गावासाठी नवीन टाकी तसेच साई नगरात व विकास कॉलनी, प्रतिभानगरात नवीन टाक्यांची तरतूद करण्यात आली आहे. कठोरा येथून नवीन पाईप लाईन सिद्धेश्‍वर नगरपर्यंत पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. ऑटो स्वयंचलित यंत्रणेचे एका कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेले जाणार आहे शिवाय संगणावरून यंत्रणा सुरू बंद करता येईल.

योजना मंजुरीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी या योजनेचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लवकरच वरणगाव पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचा विश्‍वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांसह आमदार सावकारेंचे आभार
पालकमंत्र्यांसह भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी बबन तडवी, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, भैय्यासाहेब पाटील, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, शशी संजीव कोलते, प्रतिभा समाधान चौधरी, राजेंद्र चौधरी, रवी सोनवणे, विष्णू खोले, गणेश चौधरी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, नितीन माळी, विकिन भंगाळे, वैशाली देशमुख, गणेश धनगर यांनी आभार मानले आहेत.