वरणगावजवळ अपघातात दोन ठार

0

वरणगाव । भरधाव वेगात ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवार 3 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान वरणगावजवळील अमन यूपी ढाब्यासमोर घडली. या अपघाताबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत ट्रक शिताफीन अडविण्यात आला असला तरी ट्रकचालक आणि क्लिनर फरार झाले आहेत.

विवाह पत्रिका वाटपाला जाणार्‍यांवर काळाचा घाला
दगडू नथ्थू सोळंके (वय 40) व राजेंद्र शिवराम सोनवणे (वय 43) दोघे राहणार खेडी खुर्द, ह.मु. कोळन्हावी, तालुका यावल हे दोघे मोटरसायकल क्रमांक एमएच 19 बी 6332 वरुन मुलीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी जात होते. दरम्यान फुलगाव येथील अमन यूपी ढाब्याजवळ वरणगावकडून भुसावळकडे भरधाव वेगात जाणारा ट्रक क्रमांक जीजे 16 झेड 9790 वरील चालक (नाव गाव माहित नाही) याने समोरुन येणार्‍या मोटरसायकलला जबर धडक दिली. यात मोटरसायकस्वार दगडू नथ्थू सोळंके जागीच ठार झाला तर राजेंद्र सोनवणे हे गंभीर जखमी झाल्याने यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

घटनास्थळावरून ट्रकचालक पसार होत असतांना वरणगाव पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस महेंद्र शिंगारे यांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला. परंतु ट्रकचालक व क्लिनर फरार झाले आहे. ट्रकला शिताफीने पकडणार्‍या पोलीस शिंगारे यांचे परिसरात कौतुक होत आहे. अनिल रामसिंग सोनवणे (वय 45 राहणार फुलगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक (नाव गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदशनाखाली पीएसआय प्रविण ठुबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र नारेकर तपास करीत आहे.