वरणगावातील अतिक्रमण धारकांना नगरपालिकेकडून नोटीसा

0

बसस्थानक चौक ते रावजीबुवा रस्त्यावरील अतिक्रमण हटणार

वरणगाव- बसस्थानक चौक ते रावजी बुवा नगर तसेच अक्सानगर ते नारीमळा गावातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करणार्‍या व्यावसायीकांना पालिकेकडून अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. अतिक्रमणामुळे वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता तर अतिक्रमण हटवण्याची मागणी होत होती. दरम्यान, अतिक्रमण हटवणल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक टाकणार आहे.

रस्त्यावर अतिक्रमण करून थाटली दुकाने
बसथांब्यापासून गावात जाणारा रावजीबुवा व अक्सानगर ते नारीमळा या मुख्यरस्त्यावर अतिक्रमण धारकांनी अनेक दिवसांपासून आपला व्यवसाय व उदरनिर्वाह चालवला आहे. काही व्यावसायीकांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने रस्त्यावरून चालणारे नागरीक, विद्यार्थी व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता तर अनेकदा अरूंद रस्त्यामुळे अपघातासारख्या अप्रिय घटनाही घडल्या होत्या. हा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील असून रस्त्याचे रुंदीकरण दुभाजक टाकून तयार करण्यात येणार असल्याने नगरपरीषद व सार्वजनिक बांधकाम विभाग मालकीच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण अनधिकृत बांधकाम केलेले आहे.

सात दिवसात अतिक्रमण काढण्याची तंबी
अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी नगरपालिकेने वेळोवेळी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना सुचना व नोटीसा देवूनही देखील अतिक्रमण काढण्यात आले नाही तर नगरपालिकेने पुन्हा नोटीस बजावली असून सात दिवसाच्या आत अतिक्रमण स्वखर्चाने काढून घेण्याचे बजावण्यात आले आहे. अतिक्रमणन हटवल्यास नगरपरिषद अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढेल व व येणारा खर्च संबंधिताकडून वसुल करेल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे शिवाय महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील तरतूदी नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल व होणार्‍या नुकसानीस अथवा परीणामास सर्वस्वी आपण जबाबदार रहाला, असे नगरपरीषदेच्या नोटीसीत नमूद आहे.

विकासाला विरोध नाही -विलास मुळे
मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढतांना दोघे बाजूचे अतिक्रमण सारखे काढावे, तसेच नगरपालिकेने स्वतःचे भूखंड खाली करून व्यापार्‍यांना पर्यायी जागा द्याव ी व अतिक्रमण काढतांना कोणावरही अन्याय होणार नाही याची नगरपालिकेने दक्षता घ्यावी, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास मुळे म्हणाले.

जनतेने विकासकामात सहकार्य करावे -नगराध्यक्ष
गावात जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमित व्यावसायीकांनी सहकार्य करावे. लवकरच व्यवसायीकांना व्यापारी संकुल बांधून देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.