वरणगाव पालिकेतील भाजपाच्या दोन गटातील राजकारण टोकाला ; चुकलो असेल तर भर चौकात फाशी द्या मात्र विकास थांबवू नका -नगराध्यक्ष सुनील काळे ; भावनिक आवाहन करून नगराध्यक्षांनी दिशाभूल थांबवावी -नितीन माळी ; तर प्रत्येक विषयात घालता आला असता खोडा
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव पालिकेतील राजकारण ऐन हिवाळ्यात तापले असून 10 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या समर्थक गटाने खंडपीठात धाव घेतल्यानंतर तीन कोटींच्या 12 निविदा प्रक्रियेला ‘स्टे’ मिळाल्याने सत्ताधार्यांना मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षांनी स्व-पक्षीयातीलच विरोधकांना चुकलो असेल तर भर चौकात फाशी द्या मात्र विकासकामे थांबवू नका, असे भावनिक आवाहन केले आहे तर भाजपाचे एका गटाचे गटनेते नितीन माळी यांनी शहर विकासाला विरोध नाही, मनमानी पद्धत्तीच्या कारभाराला विरोध असून विकास थांबवायचाच असता तर प्रत्येक विषयाला विरोध करता आला असता, असे सांगून नगराध्यक्षांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे.
तीन कोटींच्या विकासकामांना लागला ब्रेक
10 डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांनी 15 मिनिटात सभा गुंडाळल्याचा आरोप नितीन माळी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी करीत सभा रद्दची मागणी करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. नगरसेवक येण्याअगोदरच सभा गुंडाळल्याचा आरोपही करण्यात आला होता तसेच सभागृहात रीतसर चर्चा न करता केवळ बहुमताच्या जोरावर ती मंजूर केलेल्या विषयांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर तीन कोटी रुपयांच्या शहर विकासाच्या विविध निविदांना खंडपीठाने स्टे दिल्याने वरणगावच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
डिजिटल ‘की’ ची अडचण
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी बांधकाम अभियंता नसल्याने काही दिवसांपूर्वीच मुख्याधिकारी बबन तडवी व बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील यांची नियुक्ती झाली. या अगोदर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांची बदली झाल्याने त्यांनी आपल्याजवळील डिजिटल की पालिकेकडे सुपूर्द करणे गरजेचे होते परंतु तसे न झाल्याने संबंधित निविदा उघडता आल्या नाहीत तसेच पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे यांच्या कीवरून आठ निविदा ओपन झाल्याने त्या मंजूर करण्यात आल्या.
चुकीचे काम केले तर फाशी द्या -नगराध्यक्ष
पालिकेतील विशेष सभेमध्ये कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नाही. तांत्रिक अडचणीमुळे निविदा मंजुरीला अडचणी आल्या आहेत. विरोधकांनी शहराच्या विकासात अडचणी निर्माण करू नये जर मी चुकीचे काम केले असेल तर मला भरचौकात फाशी द्यावी, असे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.
नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल थांबवावी -नितीन माळी
खोटे बोलून नगराध्यक्षांनी जनतेला भावनिक बनवू नये. निविदा प्रक्रिया पारदर्शी पद्धत्तीने सभागृहात राबवायला हवी होती मात्र तसे झाले नाही. आमचा शहराच्या विकासाला मुळीच विरोध नाही, तसे राहिले असते तर प्रत्येक विषयांना हरकत घेवून आतापर्यंत एकही विषय मंजूर होवू दिले नसते मात्र 10 रोजीच्या सभेत ज्या विषयांना खंडपीठाने स्थगिती दिली ते विषय सभेपुढे अनधिकृत ठेवण्यात आल्याने हरकत घेण्यात आली. ज्या लोकांनी त्या सभेत 1 ते 41 विषय मंजूर करून घेतले होते त्याच लोकांनी प्रशासनाला शनिवारच्या सभेत धारेवर धरले, अशी भावना भाजपा गटनेता नितीन माळी यांनी व्यक्त करीत नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असे सांगितले.