वरणगावातील धान्यात ‘मापात पाप’ उघड ; जि.प.सदस्यांच्या तक्रारीत तथ्य

0

वजनमापे प्रमामितच मात्र गोडावूनमध्ये मोजणीत ‘झोल’

भुसावळ :- भुसावळातील स्वस्त धान्याचा घोटाळा उघड करणार्‍या जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीत तथ्य आढळले असून बुधवारी पुरवठा विभागातील सहाय्यक संचालकांच्या उपस्थितीत वरणगावला पाठवण्यात येणार्‍या धान्याच्या मोजणीत 50 किलोच्या गोणीमागे प्रत्येकी तीन ते चार किलो धान्य कमी निघाल्याने भ्रष्टाचार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. वजनमापे विभागाने केलेल्या तपासणीत वजने प्रमाणित अहल्याचा दाखला दिल्याने शासकीय गोदामातच झोल झाल्याचे सिद्ध झाले. वरणगावात पाठवण्यात येणार्‍या स्वस्त धान्यात तुट आढळल्याने त्याबाबतचा अहवाल जळगाव येथे आलेल्या पथकाला पाठवण्यात येईल, अशी माहिती पुरवठा आयुक्त कार्यालयातील सहाय्यक संचालक पद्माकर गांगवे यांनी दिली.

50 किलोमागे तीन ते चार किलो घट
भुसावळच्या शासकीय गोदामात दुकानदारांना पाठवण्यात येणार्‍या धान्यात झोल होत असल्याची तक्रार जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी धाड टाकत भ्रष्टाचार्‍यांचा पंचनामा करीत जिल्ह्यात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. सावकारे यांनी वरणगावात पाठवण्यात येणार्‍या धान्यात प्रत्येकी 10 ते 12 किलो घट असल्याचे त्यावेळी सांगितले होते व त्यावेळी करण्यात आलेल्या मोजणीतही ही बाब खडसे यांनी उघड केली होती. वरणगावचा धान्य साठा त्यानंतर सील करण्यात आला होता. बुधवारी अधिकार्‍यांची उपस्थितीत त्याची मोजणी करण्यात आल्यानंतर 50 किलोमागे तीन ते चार किलोची तूट उघड झाली आहे.

मुंबईतील पथक जळगावात
पुरवठा विभागाचे उपायुक्त पुरी, पुरवठा मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक शेख, उपसंचालक हेमंत वाडेकर जळगाव येथे ठाण मांडून आहेत तर जिल्हाभरात सुरू असलेल्या गोडावून तपासणीचा दररोज अधिकार्‍यांना त्यांना दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळसह कुर्‍हे, मुक्ताईनगर, जळगाव, बोदवड यासह अन्य तालुक्यातील गोदामांना पथकाने सील ठोकले आहे.