वरणगावातील बसस्थानकासह रेल्वे स्थानक रस्त्याची मोजणी

0

आठ दिवसानंतर मिळणारा अहवाल ; लवकरच होणार रस्त्याचे काम

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथील बसस्थानक ते रेल्वे स्थानकदरम्यानच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने 24 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या तर अनेकदा वाद झाल्याने बांधकाम विभागाने या रस्त्याची मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालय करून घेतली असून आठ दिवसांत अहवाल मिळाल्याने या रस्त्याचे काम करणे शक्य होणार आहे.

52 लाख रुपये खर्चून होणार काम
बस स्थानकापासून रेल्वे स्थानकाकडे जाताना शाळा, महाविद्यालय, विश्रामगृह, ग्रामीण रुग्णालय व रेल्वे स्टेशन असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणात व्हायची त्यामुळे वाहतुकीचादेखील गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होते यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी वाढली होती त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 52 लाख रुपये खर्चातून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला मात्र रस्त्यावरती अतिक्रमणधारक व पालिका यांच्यात खटके उडाले. त्यानंतर अतिक्रमण मोजण्यात यावे, अशी मागणी पुढे आली. त्यानंतर पालिकेने याबाबत सूचना केल्यानंतर बांधकाम विभागाने दोन लाख 25 हजार रुपये मोजणी फी भरून भूमिलेख अभिलेख कार्यालयाला मोजणीबाबत विनंती मात्र दोन महिन्यापासून प्रश्‍न प्रंलबित होता तर मंगळवारी भुमिलेख अभिलेख कार्यालयातील अधिकारी एस.पी.पाटील, भूमापक वाय.एस.ठाकूर, व्ही.एस.महाजन, गोकूळ चव्हाण, पी.जे.बारी, एस.बी.काळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस.यू.कुरेशी, पी.यू.ठाकूर, आर.बी.साळुंके यांनी रस्त्याची मोजणी केली. लवकरच नकाशा तयार करून संबंधितांना याबाबत माहिती दिली जाणार असून आठ दिवसाच्या आत याची माहिती देऊन पुन्हा हे अतिक्रमण काढण्यात येईल व नंतर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होणार आहे.

व्यावसायीकांना दिली जाईल माहिती
बसस्थानक ते रेल्वे स्थानक दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याच्या मधोमध दिवाळी डिव्हायडर टाकण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. यानुसार भुमिलेख अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांनी रस्त्याची मोजणी करून मापे लिहून घेतली. याबाबतचा अहवाल तयार करून पुन्हा अतिक्रमणधारकांना बोलावून भुमिलेख अभिलेख कार्यालयातील कर्मचारी त्यांची जागा त्या ठिकाणी दाखविण्यात येणार आहे त्यानंतर येथील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभाग शाखा अभियंता एस.यू.कुरेशी यांनी दिली.