वरणगावातून चोरलेल्या दुचाकी आढळल्या नाल्यात

0

वरणगाव- शहरातून आठ महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या दोन दुचाकी अंजनसोंडे रस्त्यावरील नाल्यात गाळ उपसा सुरू असताना आढळल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. शहरातील रावजी बुवा मंदिराजवळील चौधरी वाड्यातून आठ महिन्यांपूर्वी दोन दुचाकींची चोरी झाली होती. सुधाकर लक्ष्मण कोलते व नारायण पाटील यांच्या या दुचाकी होत्या. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हाही दाखल होता. सोमवारी बारसू रघुनाथ झोपे यांच्या अंजनसोंडे रस्त्यावरील शेताजवळ असलेल्या नाल्यातून गाळ व पाण्याचा उपसा करीत असताना दोन्ही दुचाकी गाळात रुतलेल्या आढळल्या. दुचाकी (एम.एच.19 ए.आर.2853) आणि (एम.एच.19 ए.जे.4518) असे त्यांचे क्रमांक समोर आल्याने त्यांच्या मूळ मालकाचा शोध लागला. नाल्यात रुतलेल्या दोन्ही दुचाकी गाळाने भरलेल्या होत्या. चोरीस गेलेल्या दुचाकी नाल्यात आढळल्याची माहिती कळताच घटनास्थळी गर्दी झाली. तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहे.