वरणगावात एक लाख 60 हजारांची धाडसी चोरी

महालक्ष्मी नगरात कुटुंब झोपले असतानाच चोरट्यांनी साधली संधी : वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

भुसावळ : कुटुंब घरात झोपले असताना चोरट्यांनी बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत एक लाख 58 हजारांचा ऐवज लांबवला. तालुक्यातील वरणगाव येथील महालक्ष्मी नगरात शनिवारी पहाटे उघडकीस आलेल्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

कुटुंब घरात झोपले असताना चोरट्यांनी साधली संधी
वरणगावच्या महालक्ष्मी नगरात दिलीप प्रकाश सुतार हे प्लंबर व्यावसायीक पत्नी व मुलीसह राहतात. शुक्रवार, 29 रोजी जळगाव येथे दिलीप सुतार हे शीतल सुतार यांना दवाखान्यात घेवून गेले होते. रात्री आठ वाजता कुटूंब घरी परतल्यानंतर झोपल्यानंतर मध्यरात्री चोरट्याने बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व कपाटातील 20 ग्रॅम वजनाचा व 50 हजार रुपये किंमतीचा राणी हार, 25 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅमच्या अंगठ्या, 29 हजार 750 रुपये किंमतीचे 13 ग्रॅमचे मणी-मंगळसूत्र व सोन्याची नथ, पाच हजार रुपये किंमतीचे व चार ग्रॅम वजनाचे कानातील रींग, एक हजारांचे जोडवे, 47 हजारांची रोकड मिळून एक लाख 57 हजार 750 रुपयांचा ऐवज लांबवला.

वरणगाव पोलिसांची धाव
वरणगाव शहरातील महालक्ष्मी नगरात शनिवारी पहाटे चोरी झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट पसरली. वरणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक आशीषकुमार अडसुळ व सहकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी दिलीप प्रकाश सुतार यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.