भुसावळ : सौदे पावतीवरून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर एकावर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील खडका चौफुली पुलावर गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. या प्रकरणी आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहनातच मारले ब्लेड
सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी अमोद प्रभाकर चौधरी (30, शिवाजी नगर, वरणगाव) व संशयीत आरोपी पंकज दिनकरराव देशमुख (शिवाजी चौक, देशमुख गल्ली, वरणगाव) हे जळगावकडून वरणगावकडे चारचाकी (एम.एच.19 सी.व्ही.4683) ने जात असताना दोघांमध्ये पंकजच्या राहत्या घराच्या सौदे पावतीवरून जोरदार वाद झाला. यावेळी पंकजने आपल्या जवळील ब्लेडने अमोदच्या मानेवर व डाव्या गालावर हल्ला केल्याने त्यास प्रचंड रक्तस्त्राव झाला तर या प्रकाराने चारचाकी पुलाच्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. ही घटना गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खडका चौफुलीजवळ बादशहा मोटार गॅरेजसमोर घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला समजपत्रावर सोडण्यात आले. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.