दोंडाईचातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास फाशीची मागणी
वरणगाव:- दोंडाईचा येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधरास फाशी द्यावी तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, पीडीत कुटुंबावर गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव टाकणार्या संस्थाचालक व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करून संबंधीतास बडतर्फ करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी वरणगाव शहरातील समस्त तेली पंच मंडळ , समस्त तेली समाज महिला व जय संताजी युवा फांउडेशनच्या माध्यमातून शुक्रवारी दुपारी तेली मंगल कार्यालयापासून मूक मोर्चा काढण्यात आला. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांना निवेदन देण्यात आले .
अशा आहेत मोर्चेकर्यांच्या मागण्या
पीडीत कुटुंबास न्याय मिळण्यासाठी शासनाने तज्ज्ञ व प्रसिध्द सरकारी वकील नियुक्त करावा, गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडे देऊन या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा, पीडीत कुटुंबास शासकीय निधीतून आर्थिक मदत त्वरीत देण्यात यावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी मोर्चात सर्व तेली समाजाचे महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.