तीन स्वतंत्र गुन्हे ; नगरसेवक गणेश धनगरांविरुद्धही गुन्हा ; जमावाने पोलिसांनाही केली धक्काबुक्की
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव येथे मंगळवारी उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या फिर्यादीवरुन परस्परविरोधी गुन्हे दाखल असून पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे नगरसेवक गणेश धनगर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रामपेठ भागात उसळलेल्या दंगलीनंतर गावात आता शांततेचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे.
वाहन हटवण्यावरून उसळली दंगल
मंगळवारी वरणगावचा बाजार असतानाच फैजपूरच्या व्यावसायीक व वरणगावच्या व्यावसायीकात वाहन हटवण्याच्या कारणातून वाद विकोपाला गेल्याने दोन समाजातील गटात दंगल उसळली. लाठ्या-काठ्यांचा वापर करून सर्रास दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटातील लोक जखमी झाले. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुक्ताईनगरचे सुभाष नेवे यांच्यासह निरीक्षक अशोक कडलग, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्यासह दंगा काबू पथकाने संतप्त जमावावर नियंत्रण मिळवत शांतता प्रस्थापीत केली.
नगरसेवक गणेश धनगरसह 15 जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी पहिली फिर्याद जहीरखान अख्तरखान पठाण (रामपेठ) यांनी दिली. संशयीत आरोपी तथा नगरसेवक गणेश आत्माराम धनगर, सोनू चौधरी, संजय चौधरी, रामा चौधरी, प्रदीप चौधरी, काशीनाथ धनगर, एकनाथ धनगर ,संतोष पाटील, घुनाथ धनगर, अमोल धनगर, नीलेश काळे, जितेंद्र मराठे, जितेंद्र काशीनाथ काळे, सागर उर्फ गोलू उंबरकर, अर्जुन आत्माराम धनगर यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने मुस्लीम दुकानदाराची बाजू का घेतली या कारणावरून दगडफेक करीत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दुसर्या गटाच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा
दुसर्या गटातर्फे सोनू संजय चौधरी (राम पेठ) यांनी फिर्याद दिली. संशयीत आरोपी फैजपूरचा मुस्लीम व्यापारी जावेद शहासह इकबाल, इकबालचा भाऊ, दारू मज्जावाल्याचा मुलगा हमीद अब्दुल अ.मजीद, चक्कीवाला जहीरखान अख्तरखान, वकील गॅरेजवाल्याचा मुलगा नईम खान हकीम खान, जमीर खान नईम खान, साजीदखान जाफर खान आदी 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हा चिवडा विक्रीचा दुकान आवरत असताना त्याच्या शेजारी फैजपूर येथील कटलरी दुकानदाराने दुकान लवकरच आवर मला 407 आणायची आहे, असे बोलल्याने त्याचा राग आल्याच्या कारणातून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांना धक्काबुक्की ः दोन्ही गटाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा
मंगळवारी बाजाराच्या दिवशी 407 वाहन (एम.एच.19-1547) काढण्याच्या कारणातून दोन समाजातील गट भिडले व पोलिसांनी शांतता प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल राहुल भानुदास येवले यांना धक्काबुक्की करून शहरात दंगल घडवून आणल्याप्रकरणी तसेच सार्वजनिक जागेवर दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही गटाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी धरपकड करीत दोन्ही गटातील दहा आरोपींना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.