वरणगावात बसस्थानकाअभावी प्रवाशांचे हाल : जिल्हा नियंत्रकांना साकडे

0

नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिले निवेदन ; जलसंपदा मंत्र्यांकडेही पाठपुरावा

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरात बसस्थानक नसल्याने प्रवाशांना तीनही ऋतुत अनंत अडचणीचा सामना करावा लागत असल्याने राज्य परीवहन महामंडळाने तातडीने बसस्थानकाची निर्मिती करावी, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे राज्य परीवहन महामंडळाचे जिल्हा नियंत्रक यांना निवेदन देऊन केली आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनाही निवेदन देण्यात आले.

28 खेड्यांचा संपर्क मात्र बसस्थानकाचा अभाव
वरणगाव शहराची लोकसंख्या 50 हजारांच्यावर असून या शहराशी परीसरातील 28 खेड्यांचा संपर्क येतो मात्र या शहरात बसस्थानक नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना ऊन व पावसात उभे राहुनच बसची प्रतीक्षा करावी लागते तर बसस्थानक चौकात बसस्थानकाअभावी अपघाताचाही धोका वाढला आहे. यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याबाबत सुरक्षित वाहतूक सप्ताहावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राज्य परीवहन महामंडळाचे जिल्हा नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याकडे बसस्थानकाची मागणी केली होती मात्र नगराध्यक्ष यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हा नियंत्रकाना निवेदन देऊन तातडीने बसस्थानकाची निर्मिती करण्याची मागणी केली आहे.

तर काेंंडीदेखील होणार दूर
महामार्गावरील मुक्ताईनगर रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बसथांबा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी बसथांबा मिळाल्यास गावातून बसस्थानकाकडे जाणार्‍या प्रवाशांना प्रतिभानगर मार्गे या थांब्यावर येण्यास सोयीचे होईल. इतकेच नव्हेतर या ठिकाणी रीक्षा चालकांचाही थांबा तयार होवून बसस्थानक चौकातील कोंडीही दुर होण्यास मदत होईल, अशी मागणी आहे. याबाबतचे पत्र नगरपालिकेला देण्यात आले आहे.