वरणगावात मोकाट गुरांनी मांडला रस्त्यावरच ठिय्या : वाहनधारक संतप्त

0

वरणगाव। शहरातील भर रस्त्यासह गल्ली-बोळात मोकाट गुरांनी ठिय्या मांडल्याने वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

शहरात मोकाट गुरांच्या संख्येत दिवसागणिक वाढत आहे. भर रस्त्यात गुरांनी ठाण मांडल्याने रहदारी खोळंबत असून वाहनधारकांना प्रचंड
मनस्ताप त्यामुळे सोसावा लागत आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी समर्थ पेट्रोल पंपा जवळ एका म्हशीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर नगरपरिषदेने विल्हेवाट लावली होती. अप्रिय घटनेपूर्वीच दखल घेणे गरजेचे आहे.

महामार्गासह वर्दळीच्या रस्त्यांवर गुरांचा ठिय्या
महामार्गावर, गावातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांनी ठिय्या मांडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आधीच या रस्त्यावर दोघा बाजूच्या दुकानदारांनी व हातगाडीवाल्यांनी दुतर्फा अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍या नागरीकांना व वाहन चालकांना गुरे बसलेेल्या ठिकाणावरुण वाट काढण्यासाठी कसरत करावी लागते. शहरातील गिदाडी आखाडा, शिवाजी चौक, गांधी चौक, सावकार गल्ली, भवानी नगर, भाजी साथ, प्लॉट भागातील मोकळ्या जागांवर मोकाट गुरांचा ठिय्या आहे.

गुरे मालकांवर दाखल व्हावेत गुन्हे
रस्त्यांवर मोकाट गुरे सोडणार्‍या मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. मोकाट गुरे रस्त्यावरील उकीरड्यावर प्लॅस्टीक सेवन करीत असल्याने त्यांच्यावर रोगराई पसरण्याची भीती आहे. मोकाट गुरे पकडून त्यांची गो-शाळेत रवानगी करावी, अशीदेखील अपेक्षा व्यक्त होत आहे.