वरणगावात राबविला जाणार पर्यावरण पूरक गणेशोत्सव

( उपक्रमांतर्गत पार पडली शाडू माती पासून गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा )

वरणगांवः प्रतिनिधी

वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातुन शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी उपक्रम राबविला जात आहे . या उपक्रमातंर्गत सोसायटीच्या माध्यमातुन शाडूमातीच्या गणेशमुर्ती तयार करण्याची नुकतीच कार्यशाळा पार पडली .

 

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वरणगांव शहरातील सिव्हील सोसायटीच्या माध्यमातून पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक व्हावा यासाठी सिव्हील सोसायटीने मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच सर्वांसोबत एकत्र येऊन तल्लीन होऊन त्यांनी सहभागी व्हावे म्हणून शाडु मातीच्या गणेश मुर्ती बनवण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते . कार्यशाळेसाठी खिरोदा येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री . अतुल मालखेडे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शाडुच्या मातीच्या गणेश मुर्ती साकारण्याची कला अवगत केली . शाडु माती पासून बनवलेल्या मूर्ती स्थापना करून विसर्जनाच्या वेळी घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जित करता येतात. तसेच वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून विसर्जनाच्या काळात सुद्धा निर्माल्य व मूर्ती संकलन करते . यासाठी वरणगाव सिविल सोसायटीच्या सर्व सदस्यांनी नियोजन केले असुन पर्यावरण पुरक गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी सोसायटीचे सदस्य प्रयत्न करीत आहेत .

 

*सोसायटी राबवते स्वच्छता मोहीम*

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते . मात्र, दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात अस्वच्छता झालेली दिसुन येते . यासाठी सिव्हील सोसायटीचे सदस्य पुढाकार घेऊन मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम करीत असल्याचेही दिसुन येते .