वरणगावात वीटभट्टी व्यावसायिकाचा दगड-वीटांनी ठेचून खून

0

अज्ञात मारेकरी पसार ; आर्थिक कारणातून घटनेचा प्राथमिक अंदाज

वरणगाव- शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी तथा वीटभट्टी व्यावसायीक सुनील ओंकार चौधरी (50) यांचा दगड-विटांनी ठेचून खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून यामागे आर्थिक कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुनील चौधरी हे रविवारी सायंकाळपासून घरी आलेले नव्हते. यामुळे कुटुंबीय व मित्र परीवाराने रात्रभर त्यांचा शोध घेतला. सोमवारी (दि.15) सकाळी 7 वाजता वरणगाव पोलिसात ते हरवल्याची नोंद देखील करण्यात आली. मात्र, दोन तासांनी म्हणजेच सकाळी नऊ वाजेच्या सुमारास साईनगर भागातील निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने जखमा झाल्या होत्या. सुनील चौधरी यांची विना क्रमांकाची दुचाकी देखील घटनास्थळी पडून होती. घटनेची माहिती पसरताच घटनास्थळी गर्दी झाली. याप्रकरणी सुनील चौधरी यांचा मुलगा तुषार याने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर हातउसनवारीच्या पैशांवरून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. दरम्यान, हत्येचा छडा लावण्यासाठी जळगाव येथील जंजीर नावाचे श्वान पथक बोलावण्यात आले. हे श्वान परिसरातच घुटमळले. जळगाव येथील फॉरेन्सिक लॅब पथकाने घटनास्थळी भेट देत आवश्यक नमुने संकलित केले. गुन्हे अन्वेषण पथकाने तपासाला सुरुवात केली. तत्पूर्वी, मृतदेह जळगाव शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. पोलिसांनी मृत सुनील चौधरी यांच्या फुलगाव शिवारातील लुंबिनी नगरमधील वीटभट्टीवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे.