नगराध्यक्ष सुनील काळेंच्या पाठपुराव्या यश ; जिम्नॅस्टीक हॉलसह पेव्हर ब्लॉकची कामे होणार
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेत विविध विकासकामांसाठी 75 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली असून या माध्यमातून विविध विकासकामे होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात कामे होतील, असे नगराध्यक्ष म्हणाले.
वरणगावात या कामांना मिळणार चालना
प्रभाग क्रमांक तीनमध्ये व्यायामशाळेसाठी 25 लाखांच्या निधीला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे तसेच मच्छिंद्रनाथ नगरात रस्त्यांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत 16 लाख 61 हजार 713 रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून या निधीतून काँक्रिटीकरण करण्यात येईल. प्रभाग क्रमांक एकमध्ये नारीमळ भागात 28 लाख 48 हजार 340 रुपयांच्या निधीतून रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल तसेच प्रभाग 14 मध्ये पेव्हर ब्लॉकची कामे सहा लाख 53 हजार 456 रुपयांच्या निधीतून होणार आहेत.
निधीसाठी नगराध्यक्षांनी मानले आभार
एकूण 75 लाखांच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्यधिकारी बबन तडवी, बांधकाम आभियंता भय्यासाहेब पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी कुरेश, मेहनाजबी पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, नगरसेवक गणेश चौधरी, विष्णू खोले, रवींद्र सोनवणे यांनी आभार मानले आहेत.