वरणगाव नगराध्यक्षपदी सुनील काळेंची वर्णी

0

भाजपमधील दुहीचा नवीन अध्याय

भुसावळ: तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा विरुद्ध भाजपा उमेदवार षड्डू ठोकून उभे असताना व माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत सुनील काळे यांनी बाजी मारत नगराध्यक्ष पदाचा मुकूट मिळवला आहे. 11 सदस्यांनी त्यांनी मतदान केले. माजी मंत्री खडसे यांचे समर्थक व भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांच्या पत्नी रोहिणी जावळे यांना केवळ सात मते पडल्याने त्यांचा  पराभव झाला. उपनगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक शेख अखलाख 11 मते मिळाल्याने विजयी झाले तर प्रतिस्पर्धी गणेश धनगर यांचाही सात मते मिळाल्याने पराभव झाला.

महाजनांचे वर्चस्व सिद्ध
खडसे-महाजनांचे सख्य संबंध जिल्हावासीयांना ठावूक असतानाच वरणगावात महाजनांनी लक्ष घातल्याने ही निवडणूक माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. निवडणुकीच्या एक दिवस आधीच खडसे गटाने थेट गटनेते असलेल्या सुनील काळे यांना डच्चू देत नितीन माळी यांची वर्णी लावून रोहिणी जावळेंच्या नावाचा व्हीप जारी केला होता मात्र महाजन यांनी आपले डावपेच वापरात त्यांचे खंदे समर्थक व भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींवर जबाबदारी सोपवत राष्ट्रवादीचे राजेंद्र चौधरी यांना माघार घ्यावयास लावून भाजपाच्या नेत्यांनाच शह दिला. राष्ट्रवादी व अपक्षांची मोट बांधत सुनील काळे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत तर आजी-माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री महाजन यांचे वर्चस्व सिद्ध झाल्याने आगामी जिल्ह्यातील राजकारण कुठल्या रंजक वळणावर जावून पोहोचत याकडे राजकीय समीकक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

कॅबिनेटमधून चौधरींचे अभिनंदन
खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार वरणगावातील राजकीय समीकरणे बदलण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या अनिल चौधरी यांचे कॅबिनेट बैठकीतून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अभिनंदन केल्याचे समजते.