वरणगाव परीसरात परप्रांतीय महिलेवर अत्याचार
रेल्वे प्रवासात वाढवली ओळख : फळ विक्रीचे दुकान देण्याच्या बहाण्याने बोलावत निर्जनस्थळी केला अत्याचार
Rape of migrant woman : Warangaon Ordnance DSC jawan arrested भुसावळ : फळांचे दुकान मिळवून देतो म्हणत 32 वर्षीय परप्रांतीय महिलेचा रेल्वे प्रवासात विश्वास संपादन केल्यानंतर तिला वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीत बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना रविवार, 9 रोजी घडली. वरणगाव ऑर्डनन्समधील डीएससी जवान सुखदेव राज (जम्मू काश्मीर, ह.मु.डीएसससी लाईन, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव, ता.भुसावळ) याच्याविरोधात वरणगाव पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
रेल्वेत प्रवासात वाढवली ओळख
पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार, हरीयाणा राज्यातील बल्लमगढ येथील 32 वर्षीय महिला रेल्वेद्वारे शिर्डीला जात असताना संशयीत आरोपी सुखदेव राज याच्यासोबत तिची ओळख झाली. तु माझ्या बहिणीसारखी आहे, मी तुला वरणगाव फॅक्टरीत फळाचे दुकाने लावण्यासाठी जागा मिळवून देतो, असे संशयीताने त्यावेळी फिर्यादीला सांगत मोबाईल क्रमांकाची देवाण-घेवाण केली. दहा दिवसांपूर्वी आरोपीने महिलेला वरणगावात दुकान पाहण्यासाठी बोलावल्यानंतर ती रविवार, 9 ऑक्टोबर रोजी वरणगाव फॅक्टरीत पोहोचली. आरोपीने सर्कल जवळून दुकानाची जागा दाखवली व मी राहण्याचे ठिकाण दाखवतो म्हणत महिलेला वसाहतीमधील नागेश्वर मंदिरा जवळील रहिवासी बिल्डींग रूममध्ये नेले व तिथे तिच्यावर सकाळी 10.30 ते 12.30 दरम्यान अत्याचार केला.
आरोपीला पोलिसांकडून अटक
महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने छातीवर पाय ठेवून जीवे मारण्याची प्रयत्न केला मात्र महिलेने सुटका करून घेत वरणगाव पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परशुराम दळवी, सहाय्यक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहेत.