ग्रामपंचायत आस्थापनेतून 14 कर्मचार्यांचे नगरपरीषदेत समायोजन
वरणगाव- पालिकेच्या सर्वसाधारण सभेला शहर विकासाच्या आराखड्याला शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काळे होते. उपाध्यक्ष शेख अखलाक व मुख्यधिकारी सौरभ जोशी यांच्या व्यासपीठावर उपस्थिती होती. सभेत नगर रचना विभागाचे जिल्हाधिकारी मनोहर भारगावे यांनी बंद लिफाफ्यात नगराध्यक्ष सुनील काळे यांना वरणगाव शहराचा शहर विकास आराखडा हा सादर केला होता, तो सभेत सादर करून मंजूर करण्यात आला. दरम्यान, ग्रामपंचायत आस्थापना सेवेतून नगरपरीषद आस्थापना सेवेत 14 कर्मचार्यांचे समायोजन करण्यात आले असून 28 सफाई कर्मचारी व चार मुकडदम यांचे समायोजन होणार आहे.
आराखड्यास हरकत असल्यास तक्रारीचे आवाहन
यावेळी वरणगाव शहरात मोठ-मोठे बगीचे, व्यापारी संकुल क्रीडांगण, आठवडे बाजार शाळा, वाहनतळ, अग्निशमन केंद्र ईमारत, लायबरी हॉल, मल्टिपर्पज हॉल, जलतरण तलाव, लहान मुलांसाठी बगीचे, प्रशस्त रस्ते याबाबत आरक्षित करण्यात आलेले आहेत. जनहितासाठी असलेला हा विकास आराखडा जनतेसाठी पुढील 30 दिवसासाठी खुला करण्यात आलेला आहे. जनतेला ह्या बाबत काही सुचवायचे असल्यास किंवा हरकत असल्यास लेखी हरकत नगराध्यक्ष यांच्या कडे नोंदवावी लागणार आहे. दरम्यान, उर्वरीत कर्मचारी यांचे मंजूर आकृती बंधानुसार पद नसल्याने किंवा शैक्षणिक व तांत्रिक पात्रता कमी असल्याने समावेश होऊ शकले नाही. या उर्वरीत कर्मचार्यांच्या समा योजनेबाबत शासन स्थरावर निर्णय होऊ शकतो. या उर्वरीत कर्मचार्यांचे समायोजन करण्यासाठी तसेच वेतनश्रेणी लागू होण्यासाठी सभेत ठराव मंजूर करण्यात आला.
खर्या अर्थाने होणार शहराचा विकास -नगराध्यक्ष
वरणगाव शहर विकासाचा आराखडा मंजूर करण्याचे भाग्य आपल्याला भेटल्याने आता खर्या अर्थाने शहराचा विकास होणार असल्याची भावना नगराध्यक्ष काळे यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटून आराखडा सादर केला असून शहर विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी निधीची मागणी करणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.
नगरसेवकांनी मांडल्या समस्या
शहराला यापूर्वी तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सहा दिवसावर झाला असून याबाबत दखल घेण्यात यावी तसेच शासनाने प्लॅस्टीक बंदी केल्यावरही शहरात एकही कार्यवाही का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला तसेच पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने पालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी नगरसेवक व नगरसेविकांनी यावेळी केली.
यांची होती उपस्थिती
सभेा नगरसेविका अरुणाबाई इंगळे, वैशाली देशमुख, रोहिणी जावळे, जागृती बढे, मेहनाजबी कुरेशी, शशी कोलते, माला मेढे, नसरीन बी.पिंजारी, प्रतिभा चौधरी, सुधाकर जावळे, राजेंद्र चौधरी, बबलू माळी, विष्णू खोले, विनोद चौधरी, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश धनगर नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी गंभीर कोळी, राजू गायकवाड, शंकर झोपे, सुरेश शेळके, कृष्णा माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचान संजय माळी यांनी केले.