वेदयोग विद्यालयात अनाथ बालकांना अन्नधान्याची मदत
वरणगाव- दान करण्याची बहुतांश व्यक्तींची इच्छा असते पण ते सत्पात्री व योग्य व गरजुंना मिळाले पाहिजे, असा ध्यास धरणारे मोजकेच असतात. वरणगांव फॅक्टरीतील गीताई महिला भजनी मंडळाने हा आदर्श दाखवुन मध्यप्रदेशातील खंडवालगत असलेल्या केहलाई गावातील वेदयोग महाविदयालयातील विदयार्थ्याना गहू , तांदूळ व दिवाळी मिष्ठांन्न स्वतः जावुन दान केले. भजनी मंडळ फॅक्टरी परिसरात डोहाळे, नामकरण , बारसे, वाढदिवस आदी कार्यक्रमात भजनाचा कार्यक्रम करतात. त्यातून मिळालेल्या पैश्याचा उपयोग स्वतःसाठी न करता या रकमेतून गरजुंना धान्य, वस्त्र आदी दान करतात. नुकतेच खंडवा येथील शाळेत त्यांनी धान्य दान केले. या शाळेत अनाथ तसेच गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात तसेच या शाळेला कोणतेही सरकारी अनुदान नाही. फक्त देणगीवर शाळा व वस्तीगृह चालते. 56 विद्यार्थी विविध राज्यातून तेथे शालेय व वेदाचे शिक्षण घेत आहेत. शिस्तबध्द पध्दतीने भारतीय संस्कृती टिकवुन ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आचार्य सर्वेश यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांनी स्वतः फळबाग व उद्यान तयार करून निसर्गाचा समतोल राखला आहे. गुरुकुल पद्धतीने हे शिक्षण आहे व संस्कृत भाषेला येथे महत्व दिले जाते व संस्कृत विद्यापीठातर्फे परीक्षा घेतली जाते.
यांनी दिल्या भेटी
गीताई भजनी मंडळाच्या स्मिता भोळे, ज्योती नेहते, जयश्री महाजन, संगीता चोपडे, नंदा चौधरी, सविता भोळे, सुनंदा सरोदे, माधुरी पाटील, राधा वराडे, वंदना पाटील, पुष्पा बर्हाटे, सुमन पाटील व वादक कुलकर्णी आप्पा आदींनी शाळेला भेट दिली.