खासदार रक्षा खडसेंनी डीआरएम यांची भेट घेवून घेतला आढावा : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच बसणार सीसीटीव्ही : पाणी प्रश्नही सुटणार
भुसावळ- वरणगाव रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर नगर व विस्तारीत भागातील नागरीकांना रेल्वे रूळ ओलांडतांना तसेच स्थानकावरील प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत होता. याबाबत ‘दैनिक जनशक्ती’ने 3 जुलैच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. याची खासदार रक्षा खडसे यांनी दखल घेवून बुधवारी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर.के.यादव यांची भेट घेवून वरणगाव रेल्वे स्थानकाचा आढावा घेतला तसेच स्थानकावर सुरक्षेच्या द्दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सुचना मांडली. यामुळे वरणगाव रेल्वे स्थानकावर आता लवकरच तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे.
रेल्वे स्थानकावर अनेक सुविधांचा अभाव
भुसावळ नागपूर रेल्वे मार्गावर असलेल्या वरणगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची बर्यापैकी गर्दी असते मात्र या स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधन गृह, प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती तसेच रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागाकडे असलेल्या सिद्धेश्वर नगर व विस्तारीत भागातील नागरीकांना व विद्यार्थ्यांना रेल्वे रूळ ओलांडून शहरात मार्गक्रमण करावे लागते. अशा नागरीकांवर आरपीएफ कडून दंडात्मक कारवाई केली जाते. यामुळे या भागातील नागरीकांनी स्थानकावरील पादचारी पुलाची लांबी वाढवण्याची वारंवार मागणी केली जात होती मात्र रेल्वे प्रशासन व संबधीत खासदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीक व प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत ‘दैनिक जनशक्ती’ने 3 जुलैच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. याची खासदार रक्षा खडसे यांनी दखल घेवून भुसावळ रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांची भेट घेवून विभागातील रेल्वे स्थानकावरील समस्यांचा आढावा सादर करून या समस्या त्वरीत मार्गी लावण्याची सुचना मांडली.
स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे व जल यंत्रणा
भुसावळ विभागातील वरणगाव, बोदवड, मलकापूर, रावेर आणि सावदा या स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आढावा घेतला. त्यानुसार लवकरच या स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे तसेच वरणगाव, बोदवड, मलकापूर, नांदूरा, रावेर व सावदा या स्थानकावर प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी अत्याधुनिक जलयंत्रणा बसवण्याबाबत आढावा घेवून यंत्रणा त्वरीत कार्यान्वित करण्याचे सांगितले.
या स्थानकांचे होणार सौदर्यींकरण
भुसावळ विभागातील रावेर, बोदवड व मलकापूर या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे विभागाकडे केली होती मात्र रेल्वे विभागाकडून याबाबत दिरंगाई होत असल्याने खासदार रक्षा खडसे यांनी याबाबतचा आढावा घेवून कामाला त्वरीत सुरूवात करण्याची मागणी केली आहे. यामुळे या स्थानकाचे सौंदर्यींकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
वरणगाव स्थानकावरील पादचारी पुलाची लांबी वाढणार
वरणगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागातील नागरीकांना बाजारपेठ व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून शहर गाठावे लागते. यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तसेच बहुतांश वेळा आरपीएफच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. यामुळे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची मागणी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार खासदार रक्षा खडसे यांनी याबाबतचा आढावा घेवून काम त्वरीत सुरू करण्याची पुन्हा मागणी केली.