वराडसीमच्या तीन शेतकर्‍यांचे 41 हजारांचे पशूधन चोरीला

भुसावळ : तालुक्यातील वराडसीम तीन शेतकर्‍यांच्या खळ्यातून चोरट्यांनी 41 हजारांचे पशूधन चोरून नेल्याने पशूपालक धास्तावले आहेत तर गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय तर झाली नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वराडसीम येथील शेतकरी सुधीर पुंडलिक ढाके (58) यांच्यासह गोपीनाथ पुना धनगर व विकास संतोष पाटील यांच्या वराडसीम गावातील खळ्यातून 30 जून रोजी रात्री आठ ते 1 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी 18 हजार रुपये किंमतीची गाय, आठ हजार रुपये किंमतीची दुसरी गाय व 15 हजार रुपये किंमतीचा काबरा रंग असलेला बैल मिळून 41 हजार रुपये किंमतीची गुरे-ढोरे चोरून नेली. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक गणेश पोपट गव्हाळे करीत आहेत.