तालुका पोलिसांची कारवाई ; पोलिसांना पाहताच आरोपी पसार
भुसावळ- अवैध धंद्यांविरुद्ध मोहिम उघडूनही तालुक्यात सर्रासपणे गावठी दारूचे गाळप सुरू असून अवैध धंद्यांचा समूळ नायनाट करण्याची मागणी आता पुढे आली आहे. तालुक्यातील वराडसीम येथे गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून 41 हजार रुपये किंमतीचे गावठी दारूचे रसायन नष्ट केले. पोलिसांना पाहताच आरोपीने मात्र पळ काढला. शुक्रवारीर सकाळी वराडसीमच्या इंदिरा नगरात ही कारवाई करण्यात आल्याने अवैधरीत्या गावठी दारू विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीनुसार कारवाई
वराडसीमच्या इंदिरा नगरात आरोपी रमेश तुकाराम शिंदे हा अवैधरीत्या गावठी दारूचे गाळप करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत 41 हजारांचे गावठी दारूचे रसायन नष्ट केले तसेच 30 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. दोन्ही दारूचे नमूने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. या कारवाईत फौजदार गजानन करेवाड, हर्षवर्धन सपकाळे, राजेंद्र पवार, राजू तायडे, अजय माळी, मोनी पाटील आदींचा समावेश होता.