आमदार सुनील देशमुख यांनी मांडला होता गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग
मुंबई:- अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांना विश्वासात व घेता पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल वाटपाची यादी तयार केली असा ठपका ठेवत लोकप्रतिनिधीचा व सभागृहाचा अवमान झाल्याबद्दल चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेत न्यायासनासमोर समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता. गुडेवार यांना समज देण्यासाठी गुडेवार यांना सभागृहात तयार करण्यात आलेल्या कोठडीत उभे करण्यात आले. यावेळी संपुर्ण सभागृह हे न्यायालयाच्या भूमिकेत होते. यावेळी चंद्रकांत गुडेवार यांना सभागृहाच्या कोठडीत बोलावून समज देण्यात आली .
हे देखील वाचा
काय घडला होता प्रकार
जुलैच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंग समितीने गुडेवार यांना शिक्षेबाबत निर्णय दिला होता. हक्कभंग समितीने केलेल्या चौकशीनंतर गुडेवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. विधानसभा सदस्य आणि पर्यायाने सभागृहाचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. गुडेवार अमरावती महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी सुनील देशमुख यांना डावलून पंतप्रधान आवस योजनेतील लाभार्थीची यादी जाहीर केली होती. सुनील देशमुख यांनी याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर गुडेवार यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन देशमुख यांचा दावा खोडून काढला होता. लोकप्रतिनिधींची जनमानसात प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांना विधानसभेत समज देण्यात आली.
कोण आहेत चंद्रकांत गुडेवार
चंद्रकांत गुडेवार हे प्रशासनातील प्रसिद्ध अधिकारी आहेत. गुडेवार यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम केलेले आहे त्या सर्व ठिकाणी सामान्य नागरिकांनी डोक्यावर घेतलेले होते. या मध्ये अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना जिल्ह्यातील लोकांनी डोक्यावर घेतले असले तरी जिल्हा परिषद सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करून शासनाकडे परत पाठविले होते. त्या नंतर सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून काम करत असताना लोकप्रतिनिधी आणि गुडेवार यांची कायम चकमक होत होती. चंद्रकांत गुडेवार यांची बदली करण्यात आली होती. गुडेवार यांच्या बदली नंतर सोलापुरात जन आंदोलन उभारण्यात आले होते आणि शासनाला गुडेवार यांची बदली रद्द करावी लागेल. त्यानंतर मात्र गुडेवार यांना साईड पोस्ट ला टाकण्यात आले आहे. गुडेवार यांनी अमरावती येथे महापालिका आयुक्त असतांना सुनील देशमुख आणि गुडेवार यांच्यात अधिकारावरून झालेला वाद टोकाला गेला होता.