वरिष्ठ अधिकार्‍यांना अतिरिक्त पदभार देवू नका

0
विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांची आयुक्तांकडे मागणी 
पिंपरी चिंचवड : अतिरिक्त पदभारामुळे अनेक अधिकार्‍यांना एकाही विभागाचे सुरळीत कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास वेळ देखील मिळेना झाला आहे. महानगरपालिका आस्थापनेच्या वर्ग 1 व 2 पदांवरील विविध विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात येवू नये.अशी मागणी विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी केली. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे.
मनुष्यबळाअभावी कामकाजात अडथळा…
त्यात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरुळीत आणि गतिमान होण्यासाठी आपण राज्य शासनाकडील प्रलंबित आकृतीबंधाबाबत पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मागील दोन वर्षापासून आकृतीबंध अद्याप तो मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तसेच, महापालिकेच्या मुलभूत सोयी-सुविधा देणार्‍या विभागात देखील अपुर्‍या कुशल मनुष्यबळाअभावी कामकाजात अडथळा निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत आहे. एकाच अधिकार्‍याकडे अनेक विभागाचा पदभार न देता, एकाच विभागाचा पदभार देण्यात यावा.तसेच, त्या विभागांतील अन्य रिक्त पदांवर ,सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हतेनुसार योग्य आणि सक्षम व्यक्तीला काम करण्याची संधी देण्यात यावी,अशी मागणी केली.
आकृतीबंधाचे काम होणे गरजेचे…
महानगरपालिकेच्या आकृतीबंधाचे काम न झाल्याने अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार द्यावा लागतो आहे. महापालिकेमध्ये वर्ग 1 आणि 2 च्या पदांवरील अधिकार्‍यांची अपुरी संख्या असल्यामुळे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. अधिकार्‍यांची अतिरिक्त कार्यभारातून सूटका करायची असेल, तर त्यासाठी आकृतीबंधाचे काम होणे गरजेचे आहे. असे आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी म्हणाले.