चोपडा : चोपडा ते अडावदच्या दरम्यान ट्रक अडवत वाहनाच्या काचा फोडून ट्रक चालकाला लूटण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी सहा संशयीतांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ट्रकच्या काचा फोडत चालकाला लुटले
बुधवार, 25 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवलिया (गुजरात) येथील रहिवासी हेमुभाई पोपटभाई अनियालिया (39) हे चोपडाकडून गुजरातकडे ट्रक (क्र.जी.जे. 03 ए.टी.0218) ने कपाशीचे बियाणे भरून जात असताना वर्डी फाट्याजवळ रवींद्र राजेंद्र कोळी (23), राहुल एकनाथ पाटील (19), सोनू उर्फ नितीन ज्ञानेश्वर कोळी (23), भुरा उर्फ धनराज गोकुळ सोनवणे (23), गजू उर्फ गजानन किशोर पाटील (21), रवींद्र सुरेश कोळी (29, सर्व रा.वर्डी) या संशयीतांनी एम.एच.19 एक्स.8225 क्रमांकाच्या वाहनाने ट्रकचा पाठलाग करीत बुधगाव फाट्याजवळ ट्रक थांबवून काचा फोडून चालकाकडून 50 हजार रुपये व दोन बॅटर्या लुटून नेल्या. याप्रकरणी ट्रकचालक हेमुभाई अनियालिया यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहा संशयीतांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे तपास करीत आहेत.