नवी दिल्ली। 24 जून ते 23 जुलै या कालावधीत महिला क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचे नेतृत्त्व मिताली राजकडे देण्यात आले आहे. येत्या 24 जून ते 23 जुलै या कालावधीत महिला क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने घेतलेल्या बैठकीत 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यंदाचा हा 11 वा वर्ल्डकप असून इंग्लंडमध्ये तिसर्यांदा या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याआधी 1973 आणि 1993 साली इंग्लंडला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या यजमान पदाचा मान मिळाला होता. 2005 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला होता. भारताला उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यंदा भारतीय संघाचा फॉर्म पाहता वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा चाहत्यांना आहेत.
दीप्ती आणि पूनमने विक्रम मोडले
दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांनी वन डे क्रिकेटच्या इतिहासात 320 धावांची आजपर्यंतची सर्वोच्च भागिदारी करताना एक नवा इतिहास घडवला. असा पराक्रम वन डेमध्ये अद्याप पुरुष क्रिकेटपटूही करू शकलेले नाहीत. 2006मध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपुल तरंगा यांनी वन डेमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च 286 धावांची ओपनिंग भागीदारी केलेली आहे. वन डे, टेस्ट आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही प्रकारात तिने भारताकडून सर्वोच्च भागिदारी नोंदवलेली आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या चौरंगी वन डे क्रिकेट मालिकेत आयर्लंडविरुद्ध भारताच्या दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांनी तब्बल 320 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. कोणत्याही गड्यासाठीची ही आजपर्यंतची सर्वोच्च भागिदारी आहे. या दोघींना आपण असा काही भीमपराक्रम केलाय, याची बराच वेळ माहितीही नव्हती. अगदी मॅच संपल्यानंतरदेखील त्यांना आपल्या या विक्रमाची काहीच कल्पना नव्हती.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे
मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पुनम राऊत, दिप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिक्षा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पुनम यादव, नुझात प्रविण, स्मृती मांडणा
झुलनकडून विशेष अपेक्षा
भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनेही महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याची विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. तिने 153 सामन्यात 181 बळी मिळवित हा विक्रम केला आहे. यामुळे या विश्वचषकात झुलनकडून देखील भारतीय संघाला विशेष अपेक्षा आहेत. 34 वर्षीय झुलनने ऑस्ट्रेलियाची कॅथरिन पिट्जपॅट्रीक हिला मागे टाकून सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजाचा मान पटकावला आहे. दहा वर्षांनंतर कॅथरिनचा विक्रम मोडीस निघाला. झुलनने 2002 साली आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरूवात केली होती. तिने आतापर्यंत 153 सामने खेळले असून 181 विकेट तिच्या नावावर आहेत. झुलनने दोन वेळा पाच विकेट मिळवण्याचीही किमया केली आहे.