रहाटणी :– रहाटणीत भरलेल्या ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या पक्षी आणि प्राण्याच्या अनोख्या प्रदर्शनाचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. कापसे लॉन्स रहाटणी येथे लौकिक सोमण यांच्या सौजन्याने व किलबिल स्कूलचे संचालक रफिक सौदागर यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या पक्षी आणि प्राण्याच्या अनोख्या प्रदर्शनामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांतील पक्ष्यांच्या 200 जाती, बघण्याची संधी त्याचबरोबर मत्स्य प्रदर्शन तसेच वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आणि मांजरी आणि पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या पक्षी आणि प्राण्याच्या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमांतून नागरिकांना मिळणार आहे. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, सखाराम नखाते आदी उपस्थित होते.
विविध प्रकारचे पक्षी मिळणार पाहायला
अरकारी टोकन, स्टेलास, असंख्य प्रकारचे आफ्रिकन पोपट,कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, हाताच्या बोटावर बसणारे लव्ह बर्डस, फिंचेस आणि इतर अनेक प्रकार, सुंदर रंगीत दिसणाऱ्या कोंबड्या (परदेशी) अशा या वैविध्यपूर्ण पक्ष्यांचा डोळ्यांचे पारणे फेडणारे प्रदर्शन आहे. प्रदर्शनात फक्त पक्षीच नाही तर परदेशी बकऱ्या, गिनिपिग, अशाप्रकारे अनेक प्राण्यांची हजेरी येथे आहे. प्रत्येक पक्षी आणि प्राण्यांची स्वतःची ओळख त्याबद्दलची माहिती लिखित स्वरूपात इथे मांडलेली पाहायला मिळेल. त्यांचे मूळ गाव ते त्यांच्या खाण्यापासून इतर सवयींबद्दलची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. सोबतच मत्स्य प्रदर्शनाचाही आस्वाद लुटता येईल. तसेच हे प्रदर्शन 3 मे पर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. आजच्या काळात प्लास्टिक खेळणी, प्लास्टिकचे सामान वापरून केलेले सजावटीचे साहित्य मत्स्यालयात वापरू नये, हा संदेश देण्यासाठी पूर्ण खऱ्या झाडांनी सजवलेली सुमारे ३० मत्स्यालये आणि माश्यांच्या 100 हुन जास्त जाती प्रदर्शनात आहेत. तसेच समुद्री खाऱ्यापाण्याच्या सुमारे 30 जातीच्या माशांचाही समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे.