‘वर्ल्ड टुरिझम’मध्ये कोकण महत्त्वाचे ठिकाण ठरेल – देवेंद्र फडणवीस

0

’ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे उद्घाटन

पुणे :  कोकणचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग करण्यासाठी ’ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’च्या माध्यमातून होणार्‍या सातत्यपूर्ण कामातून कोकणचा ’ब्रँड’ तयार होत आहे. वृक्षराजी, तळी आणि गोव्यापेक्षा चांगले सागर किनारे यामुळे ’वर्ल्ड टुरिझम’ मध्ये कोकण महत्त्वाचे ठिकाण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मगरपट्टा सिटीत आयोजित 7 व्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हलचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाला पाणी घालून आणि प्रदर्शन दालनाची फीत कापून झाले. त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, विजय गोगावले, किशोर धारिया याप्रसंगी उपस्थित होते.

कोकणचा ’ब्रँड’ तयार होतोय

यापूर्वीही मुंबईच्या ग्लोबल कोकण फेस्टिव्हलमध्ये मी सहभागी झालो होतो. यावर्षी पुण्यातही उपस्थित राहण्याचा योग आला. संपूर्ण कोकण या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळते. कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण फेस्टिव्हलने सातत्यपूर्ण कामातून कोकणचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे. त्यातून कोकणचा ’ब्रँड’ तयार होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पर्यटन वृद्धीसाठी 5 गावे कोकण भूमी प्रतिष्ठानने निवडली असून तेथे होम स्टे, टुरीझम वृद्धिंगत केले जाणार आहे. सरकारही कोकण विकासासाठी प्रयत्न करीत असून चिपी विमानतळ, रत्नागिरी विमानतळ, दिघी बंदर आणि चौपदरीकरण होत असलेला मुंबई-गोवा महामार्ग यामुळे 4 तासात कोकणात पोहोचणे शक्य होणार असल्याने पर्यटक कोकणात येण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यशस्वी उद्योजकांचा सत्कार

गेली 6 वर्षे मुंबईत होणारा ’ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ यावर्षी प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल कोकण फेस्टिव्हलचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहसंयोजक एम. क्यू. सय्यद यांनी स्वागत केले. कोकणातील यशस्वी उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमांची रेलचेल

हा फेस्टिव्हल 4 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहे. कोकण विकासविषयक परिसंवादाचे दररोज आयोजन केले जात आहे. कोकणची संस्कृती, कला, रोजगार, पर्यटन, गुंतवणूक, फळ प्रक्रिया, खाद्यसंस्कृती विषयक स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. 500 हून अधिक कोकणी उद्योजकांनी सहभाग घेतला आहे.