वेस्ट व्हँकव्हूर। भारतीय महिला हॉकी संघास वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसर्या फेरीच्या स्पर्धेतील सलग दोन विजयासह भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाला सलग दुसर्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. भारताने दुबळ्या बेलारुसचे आव्हान 1-0 असे मोडीत काढले. भारताचा सलामीचा विजय साकारणारी गोलरक्षिका सविता भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने दोन मिनिटे शिल्लक असताना बेलारुसचा पेनल्टी कॉर्नर झेपावत रोखला आणि भारतीय संघाने सुटकेचा निःश्वास सोडला. सविताने उरुग्वेविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर निर्णायक कामगिरी केली होती.
भारतापेक्षा बेलारुसचे स्थान आठ क्रमांकांनी खाली
वंदना कटियारने 26 व्या मिनिटास बॅक हॅण्डेड मैदानी गोल केला आणि याच जोरावर भारताने बाजी मारली. भारतीय आक्रमणे जोरदार होती; पण त्यात फिनिशिंग टचचा अभाव होता. अखेरच्या दोन सत्रांत तीन पेनल्टी कॉर्नर वाया गेले. त्यातच गोलक्षेत्रात भारतीय आक्रमकांना बेलारुसची बचावफळी संधीच देत नव्हती. भारताचा बचाव बर्यापैकी भक्कम दिसत असला, तरी त्याला क्वचितच बसणारे हादरे नक्कीच चिंताजनक होते. अखेरच्या काही मिनिटांत भारतीय बचाव जवळपास कोलमडलाच होता; पण सविता मदतीस धावून आली. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा बेलारुसचे स्थान आठ क्रमांकांनी खाली आहे. तरीही बेलारुसच्या योजनाबद्ध प्रतिआक्रमणाचा सामना भारताला करावा लागला.