पुणे । मागील वर्षभराच्या काळात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे ग्रामसेवकांबद्दल विविध तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार विविध प्रकारच्या तक्रारींमुळे जिल्ह्यातील 9 गामसेवकांवर प्रामुख्याने फौजदारी तसेच चौकशी स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली. यामध्ये फसवणूक, अधिकाराचा गैरवापर, सतत गैरहजर राहणे, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न करणे, मुल्यांकनाशिवाय जादा खर्च करून अपहार करणे, जमा खर्चाचा ताळमेळ न ठेवणे, शासनाच्या निकषानुसार काम न करणे आदी अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या.
पी. एस. गायकवाड यांच्यावर ओसाडे, मालवली ग्रामपंचायतीचे दप्तर अपूर्ण ठेवणे, मासिक अहवाल सादर न करणे, 14 वा वित्त आयोग प्लॅन प्लस मध्ये न भरणे, वरिष्ठांच्या आदेशाची अयमान्यता करणे, अनधिकृत गैरहजर राहणे, तर एम. बी. दुराफे यांच्यावर घिसर कानंद आणि निवी घेवडे या ग्रामपंचायतीचा पदभार न घेता प्रशासनास वेठीस धरणे, अनधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे तसेच सचिन रमेश पेटारे यांच्यावर सोंडे सरपाला आणि सोंडे कार्ला ग्रामपंचायतीचा पदभार न देणे, अनधिकृतपणे सतत गैरहजर राहणे, लेखापरीक्षणास दप्तरी उपलब्ध करून न देणे आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे या प्रमुख तक्रारी वेल्हा तालुक्यातील या तीन ग्रामसेवकांवर करण्यात आल्या आहेत.
वेल्ह्यातील तिघांवर कारवाई
वेल्हा तालुक्यातील पी. एस. गायकवाड, एम. बी. दुराफे आणि सचिन रमेश पेटारे या तीन ग्रामसेवकांवर कारावई करण्यात येत आहे. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील आर. जी. शेंडगे आणि सुनील चिमाजी पारधी, तर मुळशी तालुक्यातील नवनाथ शिवाजी गायकवाड, शिरूर तालुक्यातील व्ही. ए. सोनवणे, हवेली तालुक्यातील एस. व्ही. लांडगे आणि इंदापूर तालुक्यातील गुलाब विष्णू जगताप यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.