भुसावळ- नाशिक-मुंबई दरम्यान धावणार्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करून त्या ठिकाणी मेमु रेल्वे गाडया चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून निर्मिती खर्च परवडल्यास रेल्वे बोर्ड निर्णय घेणार असून प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी सांगितले. ते मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड व भुसावळ येथे पाहणी दौर्यावर आले असतांना डिआरएम कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के. शर्मा, वरीष्ठ विभागीय अभियंता समन्वय राजेश चिखले, वरीष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक स्वप्निल नीला, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुणकुमार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समस्या निराकरणाचे आदेश
महाव्यवस्थापक डी.के. शर्मा पुढे म्हणाले की, पाहणी दरम्यान भुसावळ विभागात अनेक चांगली कामे होत आहे. तीन वर्षात विभागात मोठ्या प्रमाणात विविध सुधारणा झाल्याने प्रवाशांना उत्तम सोई व सुविधा मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दौर्यात मनमाड स्थानकावरील सिव्हील ट्रीटमेंट प्लँट, सीसीटीव्ही, डिस्प्ले कोच बोर्डची पहाणी केली. तसेच भुसावळ विभागात विविध शाखांची माहिती घेतली. त्यात सुरक्षा, संरक्षण, मालमत्ता व वेळेचे नियोजन चांगले आहे. यापुढे देखील मुख्यालयात आवश्यक आधुनिक कामे व विकासासाठी त्वरीत सहकार्य करण्यात येईल. रेल्वे स्थानकावरील वाहन पार्कींगला शेडच्या सुविधेबाबत विचार करु, शेगाव स्थानकारील पार्कीग कंत्राटदार कंत्राट संपूनही वाहनधारकांकडून फी वसुल करुन वाहन चोरी होवूनही दखल घेत नाही. याबाबतही चौकशीचे आदेश दिले. येथील क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्रातील 52 खोल्यांच्या हॉस्टेलची पहाणी केली तसेच अधिकारी, कर्मचार्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करुन माहिती जाणून समस्या निराकरणाचे आश्वासन दिले.