वर्षाच्या सुरुवातीलाच सोमदेव देववर्मनचा टेनिसला अलविदा

0

नवी दिल्ली : भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनने सततच्या दुखापतींमुळे व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 31 वर्षीय सोमदेवने आपला निवृत्तीचा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला. 2017 या नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवं पाऊल उचलत असल्याचे सोमदेवने म्हटले आहे. 2012 साली सोमदेवच्या खांद्याच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. त्यातून सावरून सोमदेवने पुनरागमन केले. पण गेला बराच काळ तो स्पर्धात्मक टेनिसपासून दूर होता. सोमदेव देववर्मनने गेल्या आठ वर्षांत 14 डेव्हिस चषक लढतींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

विक्रमी 44 विजयांची नोंद
2010 साली भारताला डेव्हिस चषकाच्या वर्ल्ड ग्रुप प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात सोमदेवचा महत्त्वाचा वाटा होता. 2010 साली चीनच्या ग्वांगझूमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमदेवने पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीत सुवर्णपदके मिळवली होती. सोमदेवने 2009 साली चेन्नई ओपनचे आणि 2011 साली साऊथ आफ्रिका ओपनचे विजेतेपद मिळवले होते. त्याआधी अमेरिकेतील राष्ट्रीय कॉलेज टेनिसमध्ये सोमदेवने विक्रमी 44 विजयांची नोंद केली होती. सोमदेवला 2011 साली अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारण्याची शक्यता
टेनिसमधून स्पर्धांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सोमदेव देववर्मन प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारण्याची शक्यता आहे. सोमदेव देववर्मनने २००८ मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा सोमदेव देववर्मन भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू होता. डेविस कप स्पर्धेत सोमदेव भारताकडून १४ सामन्यांमध्ये खेळला आहे. २०१० मध्ये भारताला जागतिक गटात स्थान मिळवून देण्यात सोमदेव देववर्मनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सोमदेव देववर्मनने २००९ मध्ये चेन्नई ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेत सोमदेवला वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता. तर २०११ मध्ये सोमदेव देववर्मनने दक्षिण आफ्रिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. चीनमधील ग्वांग्झूमध्ये २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकेरीमध्ये सोमदेवने सुवर्णपद पटकावले होते.

काय म्हणाला सोमदेव
सोमदेव म्हणाला की, ‘२०१७ या वर्षाची सुरुवात व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत करतो आहे. इतक्या वर्षांपासून पाठिंबा देणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार,’ अशा शब्दांमध्ये सोमदेव देववर्मनने त्याच्या निवृत्तीची माहिती ट्विटरवर दिली आहे. खांद्याला वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे सोमदेव देववर्मन हैराण झाला होता. गेल्या काही काळापासून सोमदेव देववर्मन टेनिसपासून दूर राहिला होता.