अलिबाग । डिसेंबर महिना सुरू झाला, तरी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात शासन अपयशी ठरले आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यातील 126 जणांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यानंतर शासनाने लिड बँकेकडे पाठवलेल्या यादीनुसार 2778 लाभार्थ्यांपैकी 696 लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, तर 2082 लाभार्थी शेतकरी यामध्ये अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांना कधी कर्जमाफी मिळणार, याबाबत शेतकरी अजून संभ्रमात आहेत, तर लाभार्थी शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबतची माहिती मीडियाला देण्यास बंदी असल्याचा फतवा काढल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे शासन शेतकर्यांना कर्जमाफी दिली म्हणून जाहिरातबाजी करत आहे, तर दुसरीकडे माहिती लपवण्याचा प्रयत्नही करत आहे.
जिल्ह्यात जिल्हा बँकेचे 16,930 राष्ट्रीयकृत बँकेचे 13,320 असे एकूण 30,250 कर्जदारांनी कर्ज घेतलेले आहे. जिल्हा बँकेचे 16,764 आणि राष्ट्रीयकृत बँकेचे 8078, असे एकूण 24,842 ग्राहक नियमित आपले कर्जाचे हफ्ते फेडत आहेत, तर जिल्हा बँकेचे 166, राष्ट्रीयकृत बँकेचे 5,242, असे एकूण 5,408 ग्राहक थकबाकीदार आहेत. शासनाकडे ऑनलाइनद्वारे जिल्ह्यातील जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या 27,069 लाभार्थ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरलेले आहेत. जिल्ह्यात जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या 27,069 लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले असले, तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 166 लाभार्थी शेतकर्यांपैकी आतापर्यंत फक्त 55 जणांना कर्जमाफीचा लाभ प्राप्त झाला आहे.
शेतकर्यांमध्ये संभ्रम
राज्य सरकारने शेतकर्यांना कर्जमाफी देऊन 6 महिने उलटले तरी अजून शासनाने जाहीर केलेल्या थकीत कर्जदारापैकी जिल्ह्यातील 10 टक्केही शेतकर्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. रायगड जिल्ह्यातील कर्जदारांचा आकडा पाहता राज्याच्या तुलनेत खूपच कमी आहे, असे असतानाही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी जाहीर झालेली कर्जमाफी कधी खात्यात जमा होणार याकडे मात्र डोळे लावून बसले आहेत. त्याचबरोबर शासनाकडून लीड बँकेकडे आलेली लाभार्थी शेतकर्यांची यादी पुन्हा बँकांमार्फत तपासली जात आहे. काही लाभार्थी शेतकरी अपात्र ठरत आहेत. याबाबतही शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.