वसंतदादा सेवा संस्थेच्या कार्यक्रमाला यशवंत सिन्हा, पटोले लावणार हजेरी

0

पुणे । काँग्रेस नेत्यांशी संबंधित वसंतदादा सेवा संस्थेच्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे खासदार नाना पटोले उपस्थित राहाणार आहेत. येत्या 23 तारखेला पुण्यात हा कार्यक्रम होणार असून त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
तीन वर्षातील फसलेली अर्थव्यवस्था, नोटबंदी, जीएसटीचे अपयश अशा ज्वलंत विषयावर सिन्हा बोलणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर सिन्हा यांनी अलीकडे टीकास्त्र सोडले आहे. वाजपेयी सरकारमध्ये सिन्हा अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांनी चालविलेल्या टीकेमुळे भाजपची गोची झाली आहे. नुकतेच गुजरातमध्ये सिन्हा यांचे भाषण झाले. तिथेही संयोजक संस्था काँग्रेस संबंधित होती. पुण्यातही तेच घडते आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे अध्यक्ष असलेल्या वसंतदादा सेवा संस्थेने सिन्हा यांना निमंत्रित केले आहे. याखेरीज भाजपचे खासदार नाना पटोले यांची उपस्थिती लक्ष वेधणारी आहे. शेतकरी वर्गाबद्दल सरकारला आस्था नाही अशी मते पटोले यांनी मांडली आहेत. मध्यंतरी पटोले यांनी शिवसेना नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या. भाजपमध्ये पटोले यांच्यामुळे अस्वस्थता आहे. महाराष्ट्रामध्ये सिन्हा यांची पहिलीच सभा होत असल्याने राज्य पातळीवरही दखल घेतली जाणार आहे.