धुळे । सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दारु दुकानांची वाट लागल्याने दारुकिंग सैरभैर झाले आहेत. कायद्याची पळवाट काढत त्यांनी आपला मोर्चा आता शहरातील रहिवासी वस्त्यांकडे वळविला आहे. प्रमोद नगर सेक्टर नं.2 मधील येवू घातलेल्या प्रिन्स वाईन शॉपवरुन आणि सध्या सुरु असलेला कुणाल बारवरुन रणकंदन सुरु आहे. दारु दुकानदारांच्या घुसखोरीवरुन नगरसेविका प्रतिभा चौधरींनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. अंचुळेंना चारचौघांत सुनावले. प्रतिभा चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाने महामार्गालगतची 500 मिटर अंतरावरील दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यातच शहरातील रहिवास परिसरात दारू दुकानांचे किमान 10 ते 12 प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सादर झाले आहेत.
परवाना ताबडतोब रद्द करा
शिक्षण महर्षी नानासाो. कै. झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या मुख्य गेटपासून तसेच समोर शालीमार कॉम्प्लेक्समधील डीएमएलटी कॉलेजपासून फक्त 70 ते 80 मिटरच्या आत आहे. तसेच या परिसरात हाकेच्या अंतरावर अनेक धार्मिक स्थळे आहेत. येथे यापूर्वीच अस्तित्वातील परमिट रुम, बियर शॉपी, वाईन शॉप या मद्य दुकानांमुळे मद्यपींचा त्रास नागरिकांना होत आहे. याठिकाणी काही गुंड, टवाळखोर, टारगट मुले दिवसभर बसून असतात आणि महाविद्यालयीन तरुणी, महिलांची छेड काढतात. कुठल्याही प्रकारची दारु दुकानांना परवानगी देण्यात येवू नये. अन्यथा ती ताबडतोब रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक कमलेश देवरे, जिभाऊ बोरसे, वैभवी दुसाणे, नागसेन बोरसे आदी उपस्थित होते.