ठाणे । रॉसीबीआय आणि एसपीजीमध्ये प्रमुख असल्याची बतावणी करत 6 जणांना 85 लाख 50 हजार रुपयांचा चुना लावणार्या पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. वाईन शॉपचा परवाना देण्याच्या आमिषाने या पोलीस शिपायाने लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.अनंतप्रसाद पांडे असे या भामट्याचे नाव असून, तो येलोगेट पोलीस ठाण्यात शिपाई या पदावर कार्यरत आहे. फसवणूक झालेल्या फिर्यादी महेश पालीवाल यांनी पोलीस लखोबाच्या विरोधात 31 डिसेंबर 2017 रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पांडेला सोमवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
निरनिराळ्या कामांच्या नावाखाली घेतले पैसे
अनंतप्रसाद पांडे याने फिर्यादी महेश पालीवाल यांचा विश्वास संपादन करत वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्याने 16 लाख 26 हजार रुपये उकळले. तर खीबचंद सेवानी यांना म्हाडाकडून दुकान मिळवून देण्याच्या आमिषापोटी 50 लाख उकळले. कांतीलाल पटेल यांना रेल्वेस्थानकावर स्टॉल्स देण्याच्या बहाण्याने 3 लाख रुपये घेतले. तर, रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावण्यासाठी भरत पटेल आणि केतन पटेल यांच्याकडून 18 लाख 75 हजार रुपये उकळून वर्ष उलटले, तरीही काम न झाल्याने पालीवाल यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दोन महिन्यांनंतर झाली अटक
गुन्हा दाखल केल्याच्या दोन महिन्यांनंतर पोलिसांनी पांडेला अटक करून न्यायलयात हजर केले. सोमवारी त्याला 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपासात पांडे याने मोठी संपत्ती जमा केल्याचे समोर आल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.