पिंपरी-चिंचवड –पिंपरी-चिंचवड येथील वाकडमध्ये भरधाव टेम्पो विहीरीत पडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. वाकडमधील हॉटेल सिल्व्हर स्पून समोरच्या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले असून रस्त्याच्या मधोमध विहीर आहे. ही विहीर न दिसल्याने चालक टेम्पोसह विहिरीत पडला. नशीब बलवत्तर म्हणून चालक या अपघातात बचावला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.
संत तुकाराम कार्यालय ते ताथवडे येथील रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. या अर्धवट असलेल्या रस्त्याच्या मधोमध २० ते २५ फूट खोल विहीर असून या विहिरीला कुठलेही संरक्षण कठडे नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या विहिरीला बुजवलेले नाही. शनिवारी मध्यरात्री मालाने भरलेला टेम्पो भरधाव जात होता. रस्त्यात विहीर आहे, याची कल्पना चालकाला नव्हती. भरधाव असलेला टेम्पो थेट विहिरीत गेला. या अपघातात टेम्पो चालक बचावला असून तो जखमी झाला आहे.
महापालिकेची विहीर
बाळू काळे अस टेम्पो चालकाचे नाव आहे. नशीब बलवत्तर म्हणून तो टेम्पोसह विहिरीत पडून देखील बचावला. विहिरीत पाणी नव्हते, चालकाला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले तर क्रेनच्या सहाय्याने सकाळी टेम्पो विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.