वाकडला एकावर प्राणघातक हल्ला

0

वाकड : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड व वीट घालून जखमी केले. ही घटना नुकतीच वाकड येथील इंदिरा महाविद्यालयाजवळ घडली. अरूण विठ्ठल आखाडे (वय 35, रा. इंदिरा महाविद्यालयाजवळ, वाकड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात हल्ला करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर माने, अतुल शितोळे, पप्पू कबाडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी शंकर व पप्पू याला अटक केली असून, शितोळे हा फरार आहे. तिघेही संशयित आरोपी शनी मंदिराजवळ, वाकड येथे राहतात.

दुसर्‍यांदा झाली मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी अरूण आखाडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व वीट घालून त्यांना जखमी केले. आखाडे यांची इंदिरा महाविद्यालयाजवळ चहाची टपरी आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता कैलास जोगदंड, शंकर माने व त्याच्या चार-पाच मित्रांनी मिळून आखाडे यांच्या टपरीजवळ असलेले ऋषिकेश मुरगुंडे याला गाडी बाजूला का घेतली नाही, म्हणून मारहाण केली. यावेळी आखाडे भांडण सोडवायला गेले असता आखाडे यांनाही त्यांनी मारहाण केली. त्यामुळे आखाडे यांनी त्यांची तक्रार पोलिसात केली होती. त्याचाच राग मनात धरून माने, कबाडे व शितोळे यांनी आखाडे यांना पुन्हा मारहाण केली.