पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी दिवाळीमध्ये वाकड-पिंपळे निलखच्या विकासकामांची घोषणा करून येथील नागरिकांना दिवाळी भेट दिलेली होती. ती विकासकामे प्रगतीपथावर असून या परिसरातील नागरिकांना लवकरच अनुभवायला मिळणार आहेत. यासंदर्भात सभापती ममता गायकवाड यांनी विकासकामांची माहिती देण्यासाठी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.
92.85 कोटीची विकासकामे
वाकड-पिंपळे निलख या प्रभागात काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट चा करणे, पिंपळे निलखमधील अंतर्गत रस्ते, कावेरी सब- वे ते पिंक सिटी रस्ता सिमेंट काँक्रिटचा करणे, वाकड पिंपळे निलखमध्ये विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र उभारणे, वाकडमध्ये रोड फर्निचरची कामे करणे, वाकड गावठाण मधील रस्ते, वाकड येथील भुजबळ वस्ती मधून काळाखडक मार्गे भूमकर वस्ती येथील हिंजवडी 31 चऊठ रस्त्यालगत जोडणारा 30 मीटर रस्ता विकसित करणे, अशी जवळजवळ 92.85 कोटीची विकासकामे स्थायी समितीच्या मार्फत वाकड-पिंपळे निलखमध्ये होऊ घातलेली आहेत.
स्मार्ट प्रभागासाठी प्रयत्नशिल…
स्मार्ट प्रभागाच्या दृष्टीने ही सर्व विकासकामे काढण्यापासून ते मार्गी लावण्यापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. आजच्या घडीला ही सर्व विकासकामे अंतिम टप्प्यात असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे चालू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षांमध्ये ही सर्व विकासकामे चालू करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी म्हटले आहे.