प्रभारी जिल्हाध्यक्षावर राहणार विधानसभेची मदार
निवडणूका जिंकल्या मग राजीनामा का?
जळगाव: गल्ली ते दिल्ली अभूतपुर्व यश मिळविल्यानंतरही भारतीय जनता पार्टीत नाराजीनाट्य सुरूच आहे. जिल्ह्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली सलग सहा वर्ष दोन महिने संघटनात्मक बांधणी झाली, निवडणूकाही जिंकल्या तरी देखिल त्या जिल्हा नेतृत्वाने म्हणजेच भाजपाचे उदय वाघ यांनी जिल्हाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय ठरत असुन राजीनामा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान भाजपातंर्गत वादाचा उदय वाघ बळी ठरले आहे.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. जळगाव जिल्ह्यातही जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. यात जळगाव लोकसभा हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा ठरला. विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचा पत्ता कापून भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर झालेल्या दुसर्या यादीत जळगावमधुन आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ऐन माघारीच्या दिवशी त्यांची उमेदवारी कापून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या उन्मेष पाटलांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी कापल्यानंतर वाघ दाम्पत्यासह समर्थकांनी पक्षाविरूध्द उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. याकालावधीत अमळनेर येथे पक्षाच्या मेळाव्यात माजी जिल्हाध्यक्षाला मारहाणीची घटना घडली. मारहाणीच्या या घटनेला स्मिता वाघांवर झालेल्या आरोपांची किनार होती. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी कापल्याचा हा भडका होता अशी चर्चा होती. या घटनेत उदय वाघांचा प्रमुख सहभाग होता. वाघांच्या या दे दणादणमुळे पक्षाला फटका बसतो की काय? अशीच भिती निर्माण झाली होती. त्यामुळे उदय वाघ यांना सोयीस्कर बाजूला ठेऊन निवडणूका मोदींच्या नावावर सुखरूपपणे पार पाडल्या.
जिंकूनही राजीनाम्याची वेळ
भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सलग सहा वर्ष दोन महिने जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली. या कालावधीत लोकसभेच्या दोन निवडणूका, विधानसभा निवडणूक, जिल्हा परीषद, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा बँक आणि जिल्हा दुध संघाच्या निवडणूका झाल्या. या सर्वच निवडणूकांमध्ये भाजपाला दणदणीत यश मिळाले. सर्वसाधारणपणे पराभव झाला की त्याचे पडसाद राजीनाम्याच्या स्वरूपात उमटतात. पण जिल्हा भाजपामध्ये निवडणूका जिंकल्यानंतरही उदय वाघांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान वाघांचेही पंख कापण्यासाठीच राजीनाम्याची परीस्थीती निर्माण केली गेली का? असा प्रश्न देखिल या निमीत्ताने उपस्थित होत आहे.
वाघ ठरले चौथा बळी
जिल्हा भाजपामध्ये खडसे-महाजन गटात अंतर्गत वाद आहे. या वादाचा फटका खुद्द माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना देखिल बसला. कथित आरोपांच्या निमीत्ताने पक्षाने त्यांना मंत्रीपदावरून पायउतार केले. आमदार खडसे हे पहिला बळी ठरले. त्यानंतर दोन वेळा खासदार राहीलेल्या ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले. त्यामुळे ते दुसरा बळी ठरले. विधानपरीषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करून त्यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द केल्याने त्या तिसरा बळी ठरल्या. आणि आता उदय वाघांच्या निमीत्ताने भाजपांतर्गत वादाचा हा चौथा बळी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
विधानसभेसाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष
भारतीय जनता पार्टीची प्रदेशची बैठक आज मुंबई येथे झाली. या बैठकीत विधानसभा निवडणूकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पार पडली. प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा दुध संघाचे संचालक डॉ. संजीव पाटील यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता या प्रभारी जिल्हाध्यक्षांवरच विधानसभा निवडणूकीची मदार राहणार आहे.