मुक्ताईनगर- वढोदा वनपरीक्षेत्रातील डोलारखेडा शिवारात 2 मार्च रोजी वाघाच्या हल्ल्यात डोलारखेडा येथील लक्ष्मण गणपत जाधव यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयास एक लाख रुपये देण्यात आले परंतु मंजूर उर्वरित रक्कम अद्यापही मिळू शकलेली नाही. ही रक्कम त्वरित न मिळाल्यास पी.आर.पी.तर्फे मयताच्या कुटुंबासह वनविभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा पी.आर.पी.तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला.
कमावती व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची उपासमार
2 मार्च 2018 रोजी डोलारखेडा येथील शेतकरी लक्ष्मण गणपत जाधव हे डोलारखेडा शिवारात शेतीचे काम करीत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबात ती एकमेव कमावती व्यक्ती होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली असा परीवार आहे. कमावती व्यक्ती गेल्यानंतर या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. लक्ष्मण जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे आठ लाख रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती. एक लाखाचा धनादेश देण्यात आला होता. उर्वरित रक्कम अद्यापही मयताच्या कुटुंबियांना प्राप्त झालेली नाही. ही रक्कम वारसांना फिक्स डिपॉझिटद्वारे देण्यात येणार असल्याचे समजते परंतु ही रक्कम मयताच्या कुटुंबियांना रोख स्वरूपात त्वरित मिळावी अन्यथा मयताच्या कुटुंबियासह पी.आर.पी.तर्फे वढोदा वनपरीक्षेत्र कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा ईशारा पीआरपीतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.