बैलजोडीचा मृत्यू, शेतकर्यास वाचविण्यात यश ; नाका,तोंडात पाणी गेल्याने तरुण जिल्हा रुग्णालयात दाखल
जळगाव/ पहूर ता.जामनेर : वाघुर नदीत बुडणार्या शेतकर्यांसह दोन बैलांना वाचविण्यासाठी दोन तरुणांनी जीवाची बाजी लावली. घटनेत दोघां बैलाचा मृत्यू झाला असून शेतकर्यास वाचविण्यात तरुणांना यश आले आहे. सोमवारी जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथील घडलेल्या घटनेत बचावकार्य करणारे दोन्ही तरुणांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तरुणांनी दाखविलेल्या धाडसाचे परिसरात कौतूक होत आहे
या बाबत माहिती अशी की, पहूर पेठ येथील रहिवासी शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील हे दि. 2 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बैलगाडीने शेताकडे जात असतांना बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी बैलगाडे नदी पात्राकडे वळविली. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने रवींद्र पाटील हे बैलगाडीसह नदीपात्रात बुडाले. घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ धाव घेतली.
क्षणाचाही विलंब न करता थेट नदीत उडी
नदी जवळ गर्दी कसली हे बघण्यासाठी पलेश जानराव देशमुख (वय 29) व सागर जोमाळकर (वय 23) हे गेले असता त्यांच्या लक्षात घटना येतात त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेत बचाव कार्य केले. यात शेतकरी रवींद्र पाटील यांना वाचविण्यात दोघ तरुणांना यश आले. मात्र दोघां बैलाचा बुडून मृत्यु झाला. बचाव कार्य करत असतांना पलेश व सागर यांच्या नाका तोंडात पाणी जात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीला त्यांच्यावर पहूर ग्रामीण रुग्णालयत प्रथोमोपचार करण्यात येवून पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे.