लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर ठेकेदाराला फुटला घाम ; कारवाईकडे लागले लक्ष
भुसावळ- तालुक्यातील सुनसगाव जवळील वाघूर नदीवरील बांधण्यात येणार्या के.टी.वेअर बंधार्याच्या निकृष्ट कामासंदर्भात लोकप्रतिनिधींनी तक्रार करताच संबधीत अधिकार्यांसह ठेकेदाराचे धाबे दणाणले. संबंधिताने सोमवारी पुन्हा संबंधिताने थातूर-मातूर दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करीत असतांना जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परीषद सदस्य लालचंद पाटील, पंचायत समिती सभापती सुनील महाजन यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रश्नांच्या सरबतीने ठेकेदारासह अधिकार्यांना चांगलाच घाम फुटला. वाघूर नदीपात्रातील के.टी.वेअर बंधार्याच्या निकृष्ट बांधकामाच्या कामाची दखल घेवून जलसंधारण स्थानिक स्तर विभागाचे उपअभियंता आर.टी.पाटील व शाखा अभियंता आर.एस.सुर्यवंशी यांनी कामाची पाहणी करण्यासाठी धाव घेतली.तर ठेकेदार यांनी सोमवारी पुन्हा या कामाची थातूर-मातूर दूरूस्ती करण्याचा प्रयत्न चालवला. तब्बल 53 लाख रुपये कामासाठी मंजूर असतांना या कामासाठी 20 एमएम आकाराची आसारी वापरण्याची सूचना असताना संबधीत अधिकार्यांच्या उपस्थितीत स्वतः ठेकेदार स्वतः या कामात पुन्हा 16 एम.एम. आकाराच्या आसारीचा वापर करीत असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा परीषद सदस्या सावकारे, पाटील व सभापती महाजन चांगलेच संतप्त झाले. त्यांनी संबधीत अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
निकृष्ट काम पाडून टाकण्याची मागणी
यावेळी गेल्या दोन दिवसात करण्यात आलेले बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याची मागणाी पदाधिकार्यांनी केल्याने अधिकार्यांनी संबधित ठेकेदारास बांधकाम बंद करून नवीन बांधकाम अंदाज पत्रकानुसार करण्याच्या सूचना दिल्या.
कारवाईची प्रक्रिया राबवणार
दरम्यान, हे काम निकृष्ट आहे किंवा नाही? असा प्रश्न जि.प.सदस्या सावकारे यांनी उपअभियंता पाटील यांना विचारला असता त्यांनी बांधकाम निकृष्ट असल्याचे मान्य केले. यामुळे ठेकेदारावर कारवाई काय करणार? असे विचारले असता कार्यालयात अहवाल देण्यात येईल यानंतर कार्यालयीन कारवाई करण्याची प्रक्रिीया राबवण्यात येईल, असे सांगण्यात आले.